कुमठा येथील वृद्धशेतकरी दांपत्याचे उपोषण तहसीलदारांच्या आश्वासनामुळे मागे..
औसा प्रतिनिधी : - तालुक्यातील कुमठा येथील वृद्ध शेतकरी दांपत्याची जमीन नावावर करून द्यावी म्हणून आपली मुले अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या बाबतची सविस्तर माहिती अशी की, कुमठा ता. औसा येथील प्रल्हाद गणपती मिरगाळे व उत्तमबाई प्रल्हाद मिरगाळे यांच्या नावे 6 एकर जमीन होती. त्यापैकी दोन्ही मुलास 3 एकर जमीन नावे करून दिलेली असताना उर्वरित जमीन आमच्या नावावर करून द्यावी म्हणून आई -वडिलांस अर्वाच्च शिवीगाळ, करून मारहाण करीत आहेत. मुलांच्या त्रासाला कंटाळून प्रल्हाद मिरगाळे यांनी दि. 13 जून रोजी विषारी औषध प्राशन केले होते. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. दोन्ही मुलांचा त्रास सहन होत नसल्यामुळे कुमठ येथील वृद्धशेतकरी दांपत्यांनी मुलांच्या दमदाटी पासून संरक्षण मिळावे म्हणून दि. 14 ऑगस्ट रोजी औसा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या प्रकरणाची तहसीलदार शोभा पुजारी यांनी उपोषणार्थाना आपल्या दालनात बोलावून दमदाटी करणाऱ्या दोन्ही मुलांना हजर करून त्यांच्यावर रीतसर कार्यवाही करून एपीआय सुनील गायकवाड यांच्या समक्ष करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच मुलांच्या विरोधातील बंधपत्र रद्द ठरविण्यात येईल असे आश्वासन दिल्याने वृद्ध शेतकरी दांपत्यांनी उपोषण मागे घेतले. या प्रकरणी शिवसेना तालुकाप्रमुख सतीश शिंदे, माजी सरपंच आनंद जगताप, सामाजिक कार्यकर्ते राजू कसबे, असलमखाँ पठाण, सुरेश दादा भुरे, नागेश मुंगळे, अभयसिंग भिसेनी, कुंडलिक कांबळे, शंकर सोमवंशी यांच्या सह पत्रकार राम कांबळे, संपादक किशोर जाधव, एस ए काझी आदींनी तहसीलदार व उपोषणकर्त्यांशी चर्चा करून वृद्ध शेतकरी दांपत्याचे उपोषण सोडविले.



0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.