भारतातील पहिल्या मुस्लिम* *महिला शिक्षिका - फातिमा शेख*

 *भारतातील पहिल्या मुस्लिम* *महिला शिक्षिका - फातिमा शेख*                                        





फातिमा शेख यांनी उत्तम अशी कामगिरी केली आहे . त्या सावित्रीबाई फुले व माहात्मा फुले यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यांचा जन्म  9 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांची जयंती  महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात या दिवशी साजरी केली जाते . त्यावेळी मराठी शाळेत किंवा ख्रिश्चन मिशनरी शाळेत संस्कृत भाषा शिकवली जात होती . शूद्र आणि बहुजनांच्या मुलांना संस्कृत शिकण्यास मनाई होती . शुद्र व बहुजनांनी शिक्षणा साठी बाहेर जाने हे त्याकाळी समाजाला मान्य नव्हते. मग मुलींचा तर शिक्षणाचा प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट शूद्र आणि बहुजनांच्या मुलांना ख्रिश्चन शाळेमध्ये जाण्याची भीती वाटत होती . त्यावेळी मुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घ्यावं असा विचारही कोणी करत नसत. उच्चभू मुस्लिम कुटुंबात मौलवींना घरी बोलावून मुलींचे शिक्षण केले जात असे . मुस्लिम स्त्रिया फक्त कुराण , अरबी , पार्शियन आणि उर्दू या भाषांचे शिक्षण घेत असत . मुलींना शिक्षण देण्याची आणि शूद्रांसाठी शाळा उघडण्याची कल्पना ज्योतिबा फुले यांनी आपल्या वडिलांना आणि परिसरातील लोकांना बोलून दाखवली त्यावेळी ज्योतिबांना खूप विरोध झाला .  तुमच्या मुलाला शिक्षण घेणे हे आपले काम नाही हे पटवून द्या नाहीतर परिणामाला सामोरे जा अशा धमक्या द्यायला सुरुवात झाली . गोविंदरावांनी जोतीबांना समजावण्याचा प्रयत्न केला . काही झाले तरी ज्योतिबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले . मी माझा निर्णय बदलणार नाही असे वडिलांना सांगितल्यावर वडील गोविंदराव सरंजामी शक्तीपुढे असाह्य होते . त्यांना काळजावर दगड ठेवून आपला मुलगा ज्योतिबा व सून सावित्री यांना घराबाहेर काढावे लागले. वडीलांनी घराबाहेर काढल्या नंतर आता काय करायचे हा यक्ष प्रश्न ज्योतीबा पुढे उभा होता. अशा परिस्थितीत त्यांच्या शेजारी मुन्सी गफार बेग  यांनी दोघांनाही उस्मान शेख म्हणजेच फातिमा शेख यांच्या घरी राहण्यासाठी जागा दिली . उस्मान शेठ व महात्मा ज्योतिबा फुले शेजारी एकमेकांना चांगले ओळखत होते . फुले दांपत्य फातिमा शेख यांच्या घरी राहून तेथेच शिकू लागले . अशाप्रकारे 1848 मध्ये पुण्यात शूद्र , बहुजन आणि गरीब  मुस्लिम समाजातील मुलींसाठी भारतातील पहिल्या आधुनिक शाळेची पायाभरणी झाली . शाळा सुरु केली. त्या ठिकाणी शिकण्यासाठी मुली व शिकवण्यासाठी शिक्षकांची गरज होती. तेव्हा ज्योतिबांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन तयार केलं होतं. फातिमा शेख यांना आरबीआणि उर्दू भाषा येत होती . त्यामुळे फातिमा त्यांच्या घरच्या शाळेमध्ये पहिली विद्यार्थिनी ठरली . फुले दांपत्याकडून फातिमा शेख यांनी मराठी इंग्रजी आणि आधुनिक शिक्षण घेतले . सोमनाथ देशकर त्यांच्या संत महात्मा विचार और इस्लाम या पुस्तकात लिहितात की फातिमा शेख यांनी मराठी सोबत अनेक विषय लवकर शिकले होते . त्या फुले दांपत्यासोबत परिसरात फिरून शूद्र बहुजन आणि मुस्लिम कुटुंबांना भेटत असे आणि मुलींना शाळेत पाठवण्याची विनंती करत असे . त्यामुळे बघता बघता शाळेत येणाऱ्या मुलींची संख्या वाढू लागली . अशा स्थितीत दोन शिक्षकावर काम चालविणे असंभव होते त्याचबरोबर निस्वार्थ सेवेने शाळेत शिकविण्यासाठी महिला शिक्षिका परिसरात उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत फातिमा शेख शाळेच्या तिसऱ्या शिक्षिका म्हणून मुलींना  शिकवायला सुरुवात केली . त्यावेळी फातिमा शेख व सावित्रीबाई फुले या दोघींना ज्योतिबांनी स्वतःहून शिक्षक प्रशिक्षण दिले . शाळा वाढू लागल्या मुलांची संख्या वाढू लागली अशा परिस्थितीत तुटपुंजा ज्ञानावर , कौशल्य नसताना अध्यापन कसे करायचे ? असा प्रश्न पडला . तेव्हा फातिमा शेख यांनी देखील शिक्षक प्रशिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर अहमदनगर येथील मॅडम सिंथिया फेरस मिशनरी शाळेत दाखल झाल्या . तेथेच त्यांनी शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला . त्या काळी मुस्लिम समाजात घरच्या बाहेर मुलींना पाठवत नसत. तरी फातिमा शेख शिक्षणासाठी बाहेर पडल्या होत्या त्याच आज सर्वांसमोर आदर्श आहेत. आजही मुस्लिम समाजात मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवले जात नाही. मुस्लिम समाजाने फातिमा शेख यांना आदर्श मानून आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्यावे . शंभर टक्के मुली उच्च शिक्षित झाल्या तर हीच फातिमा शेख यांना खरी श्रद्धाजली ठरेल .12 जुलै १८५३ रोजी ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधकग्रह नावाचा आश्रम उघडला होता . त्या आश्रमात बालविवाह नंतर विधवा झालेल्या अशा महिलांना आश्रय देण्यात येत असे . समाजात अशा तरुण विधवा महिलांवर हल्ले व्हायचे, त्या जखमी व्हायच्या . त्यांच्या वर कोण उपचार करणार ? त्यांना कोण जवळ करणार ? मग अशा महिला आश्रमात आल्या तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ज्योतिबांनी आपली पत्नी सावित्री व फातिमा यांना नर्सिंगचे शिक्षणही दिले होते  . या कामात फातिमा शेख या देखील आनंदाने सहभागी झाल्या होत्या . फातिमा शेख यांनी फुले दांपत्याच्या सोबत शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली होती . सुरुवातीला उच्चवर्णी हिंदू बरोबरच मुस्लिमांनी फातिमा शेख यांच्या कार्याला कडाडून विरोध केला होता . अहमदनगर च्या प्रशिक्षणास जाताना अनेकांनी विरोध केला असला तरी फातिमा शेख व त्यांचा भाऊ उस्मान शेख हे नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे . सावित्रीबाई ह्या एकदा गंभीर आजारी पडल्यानंतर माहेरी गेल्या होत्या त्यावेळी शाळांच्या देखरेखीची आणि प्रशासनाची जबाबदारी फातिमा शेख यांच्याकडे आली होती तेव्हा त्या मुख्याध्यापक म्हणून देखील काम पाहिले होते . आपल्या पतीला लिहिलेल्या पत्रात  याचा उल्लेख आहे . सावित्रीबाईंनी फातिमाच्या कार्याचे खूप कौतुक केले आहे . या जयंती दिनी सर्व मुलीच्या पालकानी आपल्या लाडक्या मुलीला उच्च शिक्षण देवून फातिमा शेख यांना सलामी द्यावी . *ह. उ. पाठाण*                      *प्राथमिक शिक्षक*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या