लोकनायक संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहात अटक... संघटनेच्या अध्यक्ष सह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल*


लोकनायक संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहात अटक... संघटनेच्या अध्यक्ष सह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल*




लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

       या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 11/05/2022 रोजी एका तक्रारदाराने पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन तक्रार दिली की, त्यांच्या कनिष्ठ विद्यालयाचे अनुदान मूल्यांकन झाले असून सदरील मूल्यांकनाची एक कॉपी लोकनायक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात काढून घेतली. सदरची फाईल चुकीची आहे. ती फाईल मंजूर होऊ देणार नाही, तुला ऑफिसलाही फिरू देणार नाही, तुला व तुझ्या कुटुंबियांना ठार मारू अशी धमकी देऊन लोकनायक संघटनेचे

1) भाऊ उर्फ महादू रसाळ

2) किरण पाटील 

3)सर्फराज सय्यद

4) मुक्तार शेख

यांनी गेली 08 महिन्यापासून त्रास देऊन खंडणीची मागणी करत असून  1 महिन्यापूर्वी फिर्यादी कडून 80 हजार रुपये खंडणी घेतली. परत काही दिवसानंतर आणखीन खंडणीची मागणी करू लागले. आज रोजी फिर्यादीस फोन करून सराफ लाइनच्या बाजूला असलेल्या त्यांचे कार्यालयात बोलावून घेतले व तेथे 2 लाख 75 हजार रुपयाची खंडणी मागितली असा तक्रारी अर्ज दिला त्यावरून पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री.निकेतन कदम आणि परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री. अभयसिंह देशमुख यांना सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे किरण पाटील, सर्फराज सय्यद, भाऊ उर्फ महादू रसाळ, मुक्तार शेख यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 217/2022 कलम 384, 386,506, 34 भा.द.वि. प्रमाणे दिनांक 11/05/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

               पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात गुन्ह्याचा तपास सुरू झाला.

                गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादीस खंडणीची मागणी करून खंडणीची रक्कम गुळमार्केट ते शाहू चौक जाणाऱ्या रोडवरील एका पान टपरीवर घेऊन येण्यास सांगितले. वरिष्ठांचे मार्गदर्शन व आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला. मागणीप्रमाणे खंडणी मधील रक्कम स्वीकारताना लोकनायक संघटनेचा कार्यकर्ता किरण पाटील यास पंचा समक्ष सपोनि दयानंद पाटील यांच्या पथकाने खंडणीच्या रकमेसह ताब्यात घेतले.

नमूद गुन्ह्यातील आरोपी

1) किरण पाटील, वय 37 वर्ष, व्यवसाय लोकनायक संघटनेचा सामाजिक कार्यकर्ता, राहणार आंबेवाडी तालुका निलंगा

 यास खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करण्यात येणार आहे. 

           गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधीचौक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शैल्य कोले हे करीत आहेत.

                सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम,परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद कदम,श्रीशैल्य कोले,स्थानिक गुन्हे शाखा च्या पोलीस अंमलदारांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या