सय्यद अब्दुल पटेल गुरुजी : शिक्षणसेवेतील साधेपणाचा आदर्श
शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा नसतो,तर तो जीवनाचे खरे अर्थ शिकवणारा असतो.सय्यद अब्दुल पटेल गुरुजी यांचा जीवनप्रवास हेच सिद्ध करतो.२३ मे १९४० रोजी जन्मलेले गुरुजी आज ८५ वर्षांचे होत आहेत.त्यांच्या आठ दशके आणि अधिक काळाच्या आयुष्यात शिक्षण,साधेपणा आणि माणुसकी यांचे अद्वितीय संमेलन बघायला मिळते.गुरुजींचं जीवन हे कष्टात गेलं.१९४८ च्या पोलिस ऍक्शनमध्ये वडिलांचे छत्र हरपले आणि त्यानंतर आजी व चुलत्यांनी त्यांचे पालनपोषण केलं.बालवयातच वडिलांचे निधन आणि त्यानंतरचे आर्थिक संघर्ष यांने जीवनात कष्ट काय असतं याची जाणीव झाली.
१९५६ साली बैलगाडीतून लातूरला जाऊन दिलेली दहावीची परीक्षा हे त्यांच्या जिद्दीचं पहिले पाऊल होतं.१९६० मध्ये शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात करत, त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ज्यात सुप्पा, माजलगाव,आडस,गेवराई,अंबाजोगाई,नेकनूर,तेलघाना,घाटनांदूर,महापूर आणि आलमाला अशा अनेक गावात शिक्षणाचा दीप पेटवला.गावोगावी पायी चालत शाळा गाठणं,कधी महापूर येथे कलईतून नदी पार करून शाळेत जाणं ही त्यांची निष्ठा आणि समर्पण दर्शवणारी उदाहरणं आहेत. १९८८ साली औसा तालूक्यातील याकतपूर येथे मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारली आणि १९९९ साली सेवानिवृत्त झाले.गुरुजींच्या आयुष्याचा आणखी एक ठळक विशेष म्हणजे त्यांचा साधेपणा आणि काटेकोर शिस्त.ते शुद्ध शाकाहारी जेवणाचे पालन करणारे,संयमी आणि सडेतोड व्यक्तिमत्त्व.त्यांनी स्वतःच्या जीवनात आचरण केल्याशिवाय कोणालाही शिकवले नाही,हे त्यांच्या नेतृत्वगुणाचे मोठे वैशिष्ट्य.
गुरुजींचा माझ्या वडिलांशी,रसूलसाब गुरुजी यांच्याशी असलेला मैत्रीचा सहवास खूप खोल आहे.त्या काळात फक्त शिक्षक म्हणून नव्हे तर एकमेकांचे घरचे,सुखदुःखाचे सोबती अशी ही जिवाभावाची मैत्री जी आजही हे दोघे आपली मैत्री जपत आहेत.यासोबतच सुरेशअप्पा ठेसे,पै.जहूर गुरुजी,पै. देशमुख सर,अंबाजोगाई चे कै.उत्तम विश्वाद गुरुजी,असगर गुरुजी,सलीम गुरुजी नसीम गुरुजी,रशीद गुरुजी,प्रकाश जाधव सर हे त्यांचे निष्ठावान मित्र.जमालनगर येथील मस्जिदमध्ये फजर च्या नमाज पठण नंतर रेस्टहाऊस समोरच्या हॉटेलात औसा येथील सर्व मित्रांची एकत्र जमून गप्पा,चर्चा आणि सामाजिक भान असलेले विचारमंथन हे एक वेगळंच संस्कृतिक दालन बघायला मिळत होतं.कालांतराने यांच्या मैत्रीतील एक-एक धागा तुटत गेला आणि यांची बैठक कमी होत गेली.पण आज जेवढे पण मित्र हयात आहेत ते एकमेकांची विचारपूस करीत असतात,सुख-दुखाच्या गोष्टीची देवाण-घेवाण करीत असतात.घाटनांदूर तेलघाना येथील मजूर फेडरेशन चे अध्यक्ष श्री.बन्सी अण्णा शिरसाठ यांचा स्नेह १९७६ पासून,जो आजतागायत कायम आहे,जे दर वर्षी न चुकता गुरुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतात.
तसेच एक उत्तम आदर्शांनी घडवलेले गुरुजींचा एकुलता-एक आण लाडाचा लेक डॉ.जिलानी पटेल हे आज यशस्वी डॉक्टर आहेत.गुरुजींनी दिलेल्या चांगल्या संस्कारांची,शिस्तीची आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची बीजं आजही त्यांच्यात दिसून येतात.समाजासाठी काहीतरी करावं ही प्रेरणा गुरुजींनी आपल्या मुलालाही दिली.सय्यद अब्दुल पटेल गुरुजी हे नाव म्हणजे कर्तव्यनिष्ठा,प्रामाणिकपणा, साधेपणा आणि शिक्षकी मूल्यांचं प्रतीक आहे.आज जेव्हा आपण शिक्षकांना व्यावसायिकतेच्या चौकटीत पाहतो, तेव्हा पटेल गुरुजींसारखी माणसं आदर्श म्हणून पुढे येतात,ज्यांनी शिक्षक हा एक 'सेवा' धर्म म्हणून जपला.आमचे काका अब्दुल गुरुजी हे ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत,मी अल्लाह जवळ दुवा करतो की चाचांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळो,हीच मनापासून शुभेच्छा!
व्यक्तीविशेष लेख-ऍड.इकबाल रसूलसाब शेख/औसा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.