अल्पसंख्यांक दिन साजरा होतोय,पण अल्पसंख्यांक समाजाला न्याय कधी मिळणार?
दरवर्षी अल्पसंख्यांक दिन साजरा होतो.भाषणं होतात, योजनांची उजळणी होते आणि आश्वासनांची पुनरावृत्ती केली जाते.मात्र हा दिवस संपताच एक मूलभूत प्रश्न उरतो की अल्पसंख्यांक समाजाला प्रत्यक्ष न्याय मिळतो आहे का? तसं तर कागदावर योजना भरपूर आहेत.शिष्यवृत्ती,शिक्षण सहाय्य,स्वयंरोजगारासाठी कर्ज,कौशल्य विकास कार्यक्रम,सगळं काही अस्तित्वात आहे.पण गुंतागुंतीच्या प्रक्रिया,माहितीचा अभाव,दलालांची साखळी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे अनेक गरजू कुटुंबांपर्यंत हा लाभ पोहोचत नाही.
शिक्षणाच्या बाबतीतही परिस्थिती समाधानकारक नाही. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा गळतीचा दर अजूनही चिंताजनक आहे.आर्थिक अडचणी,दर्जेदार शाळांचा अभाव,भाषिक व सामाजिक अडथळे या साऱ्यामुळे समान संधींचं स्वप्न अपूर्ण राहातं.रोजगाराच्या क्षेत्रातही भेदभाव,अस्थिर कंत्राटी कामं आणि स्वयंरोजगारासाठी अपुरी मदत यामुळे आर्थिक सुरक्षितता मिळवणं कठीण बनतं.अल्पसंख्यांक दिनी मोठ-मोठी आश्वासने दिली जातात,योजना सांगितल्या जातात.असं करु-तसं करु म्हणून नारळ देतात,बस्स एवढंच पोटा-पाण्यापूर्ती सोय होते.
याहून गंभीर बाब म्हणजे,आज अल्पसंख्यांक समाज विशेषतः मुस्लिम समाज केवळ उपेक्षित नाही तर जाणीवपूर्वक टार्गेट केला जात आहे.धार्मिक ओळखीवर संशय पेरला जातो,हकनाक वाद पेटवले जातात आणि त्यातून हिंसाचाराच्या घटना घडतात.मारहाण,सामाजिक बहिष्कार आणि मॉब लिंचिंगसारख्या घटना कायद्याच्या राज्यालाच आव्हान देतात.या पार्श्वभूमीवर घटनात्मक पदावर असलेले काही मंत्री जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतात,ही बाब अत्यंत गंभीर आहे.भारताची घटना कलम १४,१५ आणि २१ अंतर्गत समानता,भेदभावमुक्त व सन्मानाने जगण्याचा अधिकार देते.मंत्र्यांची भाषा ही वैयक्तिक मत नसून सरकारची भूमिका मानली जाते. तरीही अशा वक्तव्यांवर मुख्यमंत्री पातळीवरून ठोस समज किंवा कारवाई होत नसल्याने प्रशासनाचं मौन अप्रत्यक्ष संमतीचं रूप घेतं. सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी स्पष्ट केलं आहे की, सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता हीही जबाबदारीच ठरते.न्याय म्हणजे केवळ योजना नव्हेत.सुरक्षितता,सन्मान आणि समान वागणूक हेही न्यायाचेच घटक आहेत.त्यामुळे अल्पसंख्यांक दिन हा केवळ उत्सव न राहता,सरकार आणि समाज दोघांसाठी आत्मपरीक्षणाचा दिवस ठरायला हवा.अन्यथा दरवर्षी हा प्रश्न अधिक तीव्र होत राहील.मग खरंच प्रश्न निर्माण होतो की अल्पसंख्यांक दिन साजरा होतोय,पण अल्पसंख्यांक समाजाला न्याय कधी मिळणार?
प्रश्नचिन्ह?-
ॲड.इकबाल रसूलसाब शेख,औसा.
Mo.9545253786

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.