*तीन लाख रुपये किमतीची मोटारसायकल चोरणारा ताब्यात - स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीस गेलेली महागडी मोटरसायकल चोरणाऱ्यासह ताब्यात घेत मुंबई येथील कफ परेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.
दिनांक 22/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आरोपींच्या शोधात कार्यरत होते. त्या दरम्यान, दुपारी सुमारे 4.00 वाजता डीमार्ट परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या महागडी मोटरसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने मळवटी रोडवर कारवाई केली असता, एक व्यक्ती विना नंबर प्लेटची हार्ले डेविडसन मोटार सायकल घेऊन उभा असल्याचे आढळले. चौकशी केल्यावर त्याचे नाव *श्रीधर राजेसाहेब माने, रा. कारेपुर, ता. रेणापुर, जि. लातूर* असे असून, मोटरसायकलच्या मालकीविषयी विचारपूस केली असता, त्याने मुंबईतील बी. झेलम बिल्डिंग, नोफरा, कुलाबा येथून दोन दिवसांपूर्वी मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले. आधिक तपास केल्यावर, कफ परेड पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 207/2025, कलम 303(2) BNS प्रमाणे हार्ले डेविडसन कंपनीची X-440 मोटरसायकल (मॅट ब्लॅक रंग, क्रमांक 24 BH 7549A) चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून,आरोपी श्रीधर माने व त्याच्या ताब्यातील मोटरसायकल कफ परेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीमध्ये असे स्पष्ट झाले की, आरोपी श्रीधर माने हा गेल्या पंधरा वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. त्याची नियुक्ती 757 TPT ट्रान्सपोर्ट प्लाटूनमध्ये आहे. पुढील तपास कफ परेड पोलीस ठाण्याच्या पथकाद्वारे सुरू आहे.
सदर कारवाई अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील सहाय्यक फौजदार सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार रियाज सौदागर, युवराज गिरी, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख आणि तुराब पठाण यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.