शाळेची घंटा उशीराने वाजली तर कांही बिघडणार नाही डॉ.जगन्नाथ पाटील यांची शासनाकडे मागणी





शाळेची घंटा उशीराने वाजली तर कांही बिघडणार नाही
डॉ.जगन्नाथ पाटील यांची शासनाकडे मागणी
लातूर ः शाळेची घंटी कधी वाजणार? असा प्रश्‍न शिक्षण क्षेत्रातील धुरीणांनपासून पालक व विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शाळा पुढे ढकल्याण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत अनेकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्तीमत्व, लेखक, संपादक डॉ.जगन्नाथ शामराव पाटील यांनी शाळा उशीरा चालू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शाळा सुरू करण्याबाबत समाजामध्ये संवाद, विसंवाद चालू आहेत. शाळा सुरू केल्या तर काय होईल? त्याचे परिणाम काय होतील? लहान मुलांना शाळेत येवू द्यायचे की नाही? याबाबत सध्या समाजामध्ये विचारमंथन चालू आहे. या सर्वांच्या पार्श्‍वभुमीवर डॉ.जगन्नाथ पाटील यांनी शासनाकडे एक सविस्तर निवेदन पाठवून कांही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. आणि कांही बहुमूल्य सुचनाही केल्या आहेत.
शाळा आणखी महिनाभरानंतरही सुरू केल्या तर कांही बिघडत नाही. 15 ऑगस्टपासून शाळा चालू कराव्यात असे डॉ.पाटील यांनी शासनाला सुचविले आहे. कोरोनाचा संसर्ग किती दिवस राहील याबाबत अंदाज वर्तविणे कठीण आहे. या काळात पालक व शिक्षकांनी तसेच संस्थाचालकांनी काय काळजी घ्यायला हवी? शाळा सुरू कराव्यात पण त्या कशा पध्दतीने सुरू कराव्यात याबाबत अनेक संभ्रम आहेत. कांही जणांचे मत ऑनलाईन शिक्षण पध्दतीने शाळा सुरू कराव्यात असे आहे. मात्र तसे न करता शाळा सरू कराव्यात पण त्या उशीराने कराव्यात अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
शाळा सुरू करायच्या असतील तर त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा उहापोह या निवेदनाद्वारे केला आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी असावा. दोन विद्यार्थ्यांमधील अंतर 5 फुटांचे असावे. विद्यार्थ्यांनी पिण्याचे पाणी घरातूनच आणावे. शाळेत दिला जाणारे मध्यान्ह भोजन बंद करावे. विद्यार्थ्यांना गृहपाठ न देता पाठांतरावर भर दिला जावा. तोंडी परिक्षा घेतल्या जाव्यात. पाच दिवसांचा आठवडा शिक्षण क्षेत्राला लागु करावा. आठवड्यातून दोन दिवस शाळांना सुट्टी द्यावी. विद्यार्थ्यांना गणवेश सक्तीचा करू नये. त्यासाठी शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांना आग्रह करू नये. किमान एक वर्षभर तरही उपाययोजना करावी. शाळेचा वेळ कमी करावा. विद्यार्थ्यांना घरातून खाद्यपदार्थ आणण्यासाठी बंदी घालावी. लहान पटसंख्या असतील अशाच शाळा सध्या चालू करायला परवानगी द्यावी. ज्या शाळेमध्ये 2000 हजारांपेक्षा जास्त संख्या अशा शाळा सध्या चालू करता कामा नये. मुलांची संख्या कमी करणे. जीवनपध्दती बदलणे. तुकडया कमी करणे याबाबीकडेही शासनाने लक्ष द्यावे असेही त्यांनी या निवेदनाद्वारे सुचित केले आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मेडीक्लेमसारखा संयुक्त विमा काढला जावा. दुर्दैवाने कोरोनाचा संसर्गामुळे शिक्षक किंवा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचा लाभ या संबंधीतांना या विम्याद्वारे मिळू शकेल. त्यासाठी शासनाने याकडे गांभीर्याने पहावे असेही त्यांनी यावेळी आपल्या निवेदनाद्वारे शासनाला कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या