आ.संभाजीराव पाटील निलंगेकरांनी केली दिव्यांग उपयोगी साहित्याची पाहणी
लातूर ः जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी केंद्र सरकार अंतर्गत असणार्या भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम लिमिटेड (एलिम्को) आणि जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग व दिव्यांग पुर्नवसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानातून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक असणारे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारा हा कार्यक्रम देशातील दुसरा ठरणार असून यावेळी दिव्यांगांना वाटप करण्यात येणार्या साहित्याची पहाणी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली. यावेळी खा.सुधाकर श्रृंगारे, संवेदनाचे सुरेश पाटील, जि.प.चे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे आदिंची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील दिव्यांगांना उपयुक्त ठरणारे साहित्य व कृत्रीम अवयव विनाशुल्क मिळावे याकरिता पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असतांना आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करून त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याकरिता तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. याकरिता जिल्हा परिषदच्या समाजकल्याण विभागाने पुढाकार घेतला होता आणि त्यांना जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र व संवेदनाने हातभार लावलेला होता. या नोंदणीनंतर दिव्यांगांची तपासणी करण्यात येवून त्यांना उपयोगी ठरणार्या साहित्यांची नोंद करण्यात आली होती. आता या दिव्यांगांना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय यांच्या अंतर्गत असलेल्या भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम लिमिटेड (एलिम्को) यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा देशातील दुसरा ठरणार असून याकरिता लातूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागासह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास 9 हजार दिव्यांगांना साहित्याचे वाटप होणार आहे. सदर साहित्य एल्मिकोच्यावतीने लातूर जिल्ह्यात येण्यास सुरूवात झाली असून शहरासह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सदर साहित्ये पोहचलेले आहे.
आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी या साहित्याची पाहणी केली. यावेळी खा.सुधाकर श्रृंगारे, संवेदनाचे सुरेश पाटील, जि.प.चे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, लातूर मनपाचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा गटनेते अॅड.शैलेश गोजमगुंडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खामितकर, एल्मिकोचे संजय मंडल यांची उपस्थिती होती. यावेळी आ.निलंगेकर यांनी दिव्यांगांना सदर साहित्य वाटप करण्यासाठी आवश्यक असणार्या सुचना संबंधीतांना देवून हा कार्यक्रम यशस्वी राबविण्यासाठी सामुहिक प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.