आता प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती ऑडिट केल्याशिवाय कोणतेही देयक अदा करू नयेत- महापौर,उपमहापौर यांचे आदेश कंटेनमेंट झोन करिता संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे.




आता प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र सहाय्यक  आयुक्तांची नियुक्ती 

ऑडिट केल्याशिवाय कोणतेही देयक अदा करू नयेत- महापौर,उपमहापौर यांचे आदेश


कंटेनमेंट झोन करिता संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे.

पालिकेच्या कोरोना टास्कफोर्सची आढावा बैठकित महत्त्वपूर्ण निर्णय.

लातूर /प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या कोरोना टास्कफोर्सची आढावा बैठक  सोमवारी (दि.२७ जुलै )संपन्न झाली. शहरातील चारही झोनसाठी नोडल ऑफिसर म्हणून सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मनपाच्या वतीने कोरोना काळातील केल्या जाणाऱ्या  प्रत्येक कामाच्या खर्चाचे ऑडिट केल्याशिवाय देयक अदा करू नयेत,असे आदेशही महापौर गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी यावेळी दिले.
कंटेनमेंट झोनसाठी कठोर उपायोजना करण्यासोबतच तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ वाढवून देण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे. महापालिका कार्यालयात सोमवारी या टास्क फोर्सची आढावा बैठक घेण्यात आली. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, पालिका आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांची या बैठकीस उपस्थिती होती.
  कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षमपणे राबविता याव्यात यासाठी शहरातील चारही झोनसाठी नोडल ऑफिसर म्हणून प्रत्येकी एका सहाय्यक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. संबधित झोन करिताचे सर्व अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची अधिक खोलवर शोधमोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० व्यक्तींची माहिती संकलित करावी. त्यांच्या तपासण्या कराव्यात,असेही या बैठकीत निर्देशित करण्यात आले.


चौकट १
   कंटेनमेंट झोनसाठी कठोर उपाययोजना ..
  कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या व्यक्तीच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला जातो.या परिसरातील व्यक्तीने बाहेर पडू नये यासाठी तो सील केला जातो. या कंटेनमेंट झोनसाठी आणखी कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. त्या परिसरातील नागरिक बाहेर पडून इतरांमध्ये मिसळू नयेत. यातून अधिक लोकांना संसर्ग होऊ नये, याची काळजी घ्यावी, असेही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या बैठकीत सूचित केले.

चौकट २
प्रत्येक खर्चाचे ऑडिट ..
 कोरोनाच्या काळात महापालिकेच्यावतीने विविध कारणांसाठी खर्च केला जात आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कंटेनमेंट झोनसाठी खर्च होत आहे. या कालावधीत होणाऱ्या प्रत्येक खर्चाचे ऑडिट झाले पाहिजे. ऑडिट केल्याशिवाय कुठलेही देयक अदा करू नये,असे आदेश महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या बैठकीत दिले.ऑडिट करण्यासाठी मुख्य लेखाधिकारी प्रभाकर डाके यांची नियुक्ती करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. काही मनपा सदस्यांनी दूरध्वनी द्वारे महापौर व उपमहापौर यांना  कंटेनमेंट झोन मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाय योजना बाबत तक्रार व्यक्त केल्या त्यावर संबंधित कामाची पूर्ण तपासणी करून ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

चौकट ३
 मनुष्यबळ उपलब्ध करावे ..
मनपा सदस्यांची मदत घ्यावी
शहरातील कंटेनमेंट झोनची वाढती संख्या पाहता महापालिकेकडे उपलब्ध असणारे मनुष्यबळ कमी पडत आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील मनुष्यबळ आवश्यकतेनुसार वाढवून देण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कंटेनमेंट झोनमधील उपाययोजनांसाठी अधिक स्वयंसेवक उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित प्रभागातील नगरसेवकांची मदत घ्यावी. त्यांच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या