विवेकानंद रुग्णालयास महापौर-उपमहापौरांची भेट
कोरोनावरील उपचारांची
घेतली माहिती
लातूर /प्रतिनिधी:डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यताप्राप्त असणाऱ्या विवेकानंद रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व पालिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी सोमवारी रुग्णालयास भेट देऊन उपचारांची माहिती घेतली.
विवेकानंद रुग्णालयाने सामाजिक भान जपत कोरोनावर उपचार सुरू केले आहेत. यासाठी स्वतंत्र इमारत (४० खाटा) आरक्षित करण्यात आल्या आहेत. अतिदक्षता विभाग व स्वतंत्र वॉर्डचीही सोय रुग्णालयाने केलेली आहे.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. शहरातील रुग्णांची संख्या वाढत असताना विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व पालिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी सोमवारी रुग्णालयास भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेतली.कोरोनाबाधित रुग्णावर कसे उपचार केले जातात ?रुग्णालयाने कशा पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे ?हे त्यांनी समजून घेतले. विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अरुणा देवधर, सचिव डॉ. तथा नोडल ऑफिसर डॉ. राधेश्याम कुलकर्णी,सहसचिव आणि प्रशासनिक संचालक श्री अनिल अंधोरीकर,डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी रुग्णालयात सुरू असणाऱ्या उपचारांची माहिती दिली.
कोरोना बाधित रुग्णावर सुरू असणारे उपचार आणि विवेकानंद रुग्णालयाने घेतलेली जबाबदारी पाहून महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी समाधान व्यक्त केले. रुग्णालयातील उपचार पद्धती, विलगीकरणाची सुविधा आणि उपचार याची पाहणी करून उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही त्यांनी संवाद साधला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी लातूर लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.