जिल्ह्यात विक्रमी कापूस खरेदी - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड



जिल्ह्यात विक्रमी कापूस खरेदी
                        - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड
        हिंगोली, दि.27:  राज्यात कोविड-19 सारखी आपत्तीची परिस्थिती असतांना देखील पणन विभागामार्फत राज्यात विक्रमी सुमारे 219.49 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यातही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दूप्पटीने कापूस खरेदी झाली असल्याची पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
           राज्यात मागील 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली आहे. या खरेदीचे एकूण मुल्य 11, 776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,0289.47 कोटी रक्कम शेतकऱ्यांना अदा देखील करण्यात आली आहे. तसेच सीसीआयने 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषीत केले आहे.
            हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या आपत्तीजन्य कालावधीत काही दिवस खरेदी बंद होती. परंतु नंतर खरेदी सुरू करण्यात आली व आगाऊ नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्यात आला.  जिल्ह्यात यावर्षी 1 हजार 804 शेतकरी बांधवांनी आपली नोंदणी केली होती. अद्यापपर्यंत जिल्ह्यात 17 हजार 960 शेतकरी बांधवांचा 4 लाख 20 हजार 852.55 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यामध्ये कापूस पणन महासंघामार्फत 2 हजार 713 शेतकऱ्यांची 56 हजार 370 क्विटंल तर सी.सी.आय. मार्फत 9 हजार 826 शेतकऱ्यांची 2 लाख 67 हजार 870.45 क्विंटल, खाजगी बाजार मार्फत 2 हजार 367 शेतकऱ्यांची 49 हजार 742.10 क्विंटल तर बाजार समितीतील अनुज्ञाप्तीधारक व्यापाऱ्यामार्फत 3 हजार 055 शेतकऱ्यांची 46 हजार 870 क्विंटल अशी एकुण 17 हजार 960 शेतकरी बांधवांचा 4 लाख 20 हजार 852.55 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याची माहिती उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली.
****

 
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनाचे पालन करुन बकरी ईद साजरी करावी
                                                                                                            -   जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
 
        हिंगोली, दि.27: सद्यस्थितीत कोरोनाचा (कोवीड-19) प्रादूर्भाव अधिक प्रमाणात पसरत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच काही जणांचा या संसर्गामुळे मृत्यू देखील झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897  दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करुन त्याबाबतची नियमावली तयार केली आहे. तसेच शासनाने दि. 17 एप्रिल,2020 रोजीच्या आदेशान्वये एकत्रीत सुधारीत मार्गदर्शक सूचना देखील निर्गमीत केल्या आहेत.
            सद्या कोरोना संसर्गामुळे वाढत असलेल्या रुग्णाची संख्या लक्षात घेता मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हा सण जवळ आला असून मुस्लीम बांधव दरवर्षी हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करतात. बकरी ईदच्या निमित्ताने मूस्लीम बांधव हे मोठ्या संख्येने मशीदमध्ये एकत्र येवून सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. परंतू सद्य परिस्थितीचा विचार करता एका ठिकाणी अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव होवून मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. याकरीता कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा करणे मूस्लीम बांधवाच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हिताचे नाही. त्याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व मुस्लीम धर्मीय नागरिकांना खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. या सूचनाचे पालन करुन आपण आपले व आपल्या कुटूंबाच्या आरोग्याचे रक्षण करत बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा.
            कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बकरी ईदची नमाज मशीद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. तसेच कुर्बानीसाठी मुस्लीम बांधवांनी गर्दी करु नये. कोरोनाचा प्रादूर्भाव पसरु नये याकरीता प्रतिबंधीत क्षेत्रातील मुस्लीम बांधवांनी आपल्या नावांने ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करुन घ्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एकत्र येवू नये. घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येवून नमाज पठण करु नये. कोणत्याही सामाजिक, धार्मीक किंवा कौटूंबीक कार्यक्रमासाठी एकत्रित येवू नये.  तसेच महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडु नये, घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखावे तसेच वेळोवेळी हात धुणे आदी नियमाचे पालन बकरी ईद सणाच्या दिवशी कटाक्षाने करावे. सर्व मूस्लीम बांधवांनी त्याच्या घरातच नमाज पठण आदी धार्मीक कार्य पार पाडावे. कोरोना (कोवीड-19) विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे.
            करोनाची साथ झपाट्याने वाढत असून जिल्हा प्रशासनाकडून ती रोखण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न आपण करीत आहोत. मागील 4 महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण नियमाचे पालन करुन मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने नियमांचे पालन करून साजरी व्हावी', अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.
****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी मार्गदर्शक नियमावली

·      बँक खाते धारकांना ऑनलाईन व्यवहार करण्याचे आवाहन
        हिंगोली,दि.27: जिल्ह्यातील बँकामध्ये विविध शासकीय योजनाचे तसेच वैयक्तिक कारणांसाठी रक्कम काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याकरीता जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूीवर व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनामार्फत मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आली आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व बँकांची पैसे काढण्याची (Cash Withdrawal) सुविधा बंद करण्याबाबत दि. 22 जूलै, 2020 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतु काही बँक व्यवस्थापक आणि APMC, मोठे उद्योग व मोठे व्यापारी वर्गामार्फत आलेल्या निवेदनानुसार बँकामध्ये संस्थात्मक पैसे काढण्याला (Cash Withdrawal) मुभा देण्यात आली होती.
            परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन-धन खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून महिलांच्या खात्यात प्रत्येकी 500 रुपये जमा झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीची रक्कम जमा झाली आहे. तसेच पीक विमा आणि पीक कर्ज काढण्यासाठी किंवा इतर अर्थिक व्यवहारासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिक बँक आणि एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्रावर गर्दी करत असून याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे.            पैसे काढण्याची (Cash Withdrawal) सुविधा बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खालीलप्रमाणे नियोजन केले असून यापूढे या नियमाचे पालन करुनच नागरिकांना बँकेतून पैसे काढता येणार आहे.
            ज्या क्षेत्रात तसेच गावांमध्ये बँकांचे Business Correspondent (BC) तसेच Customer Service Center (CSC) केंद्र आहेत अशा ठिकाणी Business Correspondent (BC) तसेच Customer Service Center (CSC) च्या माध्यमातून रक्कमेचे वाटप करण्यात यावे. या दरम्यान ग्राहक सेवा केंद्रात सामाजिक अंतर राखुन मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. ज्या क्षेत्रात किंवा गावात BC/CSC मार्फत रोख वाटप करणे शक्य नाही अशा ठिकाणी ग्रामसेवकामार्फत पुढीलप्रमाणे नियोजनाने रोख वितरण करण्यात येणार आहे. बँकांना जी गावे दत्तक देण्यात आली आहेत असे गावनिहाय रक्कम वाटप करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात यावे. तसेच सदरचे वेळापत्रक पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती तसेच संबंधीत ग्रामपंचायतीना कळवावे. ग्रामसेवक यांनी गावामध्ये ज्या नागरिकांना रोख रक्कम काढावयाची आहे अशा नागरिकांना पैसे काढण्याची (Withdrawal) स्लीप देऊन स्लीप भरून घ्यावी. ग्रामसेवक यांनी वेळापत्रकानुसार रक्कम वाटप करावयाच्या एक दिवस अगोदर Withdrawal स्लीप संबंधीत बँकांमध्ये जमा करावी. वेळापत्रकानुसार निश्चित केलेल्या गावात जातांना सोबत पोलीस विभागाचे पथक घेऊन जावे. रक्कम वाटप करतेवेळी पथकाने संबंधीत नागरिकाची ओळख पटण्यासाठी त्याचे आवश्यक कागदपत्रे/पुरावे याची तपासणी करून रक्कम वाटप करावी. निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार गावात जाण्याची तसेच रक्कम वाटप करते वेळी पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. रक्कम वाटप करते वेळी संबंधितांनी शासनाच्या नियमानुसार सामाजिक अंतर राखावे तसेच मास्कचा वापर व हातांची स्वच्छता करावी. यानुसार सदरील आदेशाची अंमलबजावणी दि. 27 जूलै, 2020 रोजीपासून करण्यात यावी. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, सर्व बँकांचे व्यवस्थापक, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, Business Correspondent (BC) / Customer Service Center (CSC) केंद्रांचे समन्वयक तसेच व्यवस्थापक यांची असणार आहे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यावर नियंत्रण ठेवणार आहेत.
            खातेधारकांनी जिल्हा प्रशासनाने वरील प्रमाणे ठरवुन दिलेल्या अंतराच्या निमयावलीचे तंतोतंत पालन करुन बॅंकेमध्ये व बॅंकेच्या परीसरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे (सामाजीक अंतर) पालन करावे. परंतू शक्यतो जिल्ह्यातील नागरिकांनी बँकेत किंवा एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्रातून खात्यावरील पैसे काढण्याऐवजी ऑनलाईन किंवा ए.टी.एम.द्वारे आपले अर्थ‍िक व्यवहार करावे असे अवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
            सदर आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल आणि संदर्भीय कायद्यानुसार संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या