उजाड माळरानावर अंध शेतकरी रोकडेंची पाचशे वृक्षांची डोळस लागवड - जोपासना


उजाड माळरानावर अंध शेतकरी रोकडेंची पाचशे वृक्षांची डोळस  लागवड - जोपासना




औद्योगिकरणाच्या मागे लागून माणसाने प्रचंड वृक्षतोड केली,यंत्रांची अनगिनत निर्मिती केली,याची परिणती पृथ्वीवरचे पर्यावरण बदलात झाले.सातत्याने तापमानात वाढ होतेय,आणि पावसाचे प्रमाणही कमालीचे कमी होत गेले, होते आहे,आणि माणूस नवनवीन आजारांना बळी पडतो आहे..हे सर्व आता पुन्हा पूर्वपदावर न्यायचे असेल तर आता  प्रत्येकाने आपापल्या परिसरात वाढणारे वृक्ष लागवड करुन,त्याचे संगोपण करणे जिकीरीचे झाले आहे,याची  नाडीपरीक्षक ,वनौषधी जाणकार,वृक्षप्रेमी,दोन्ही डोळ्यांनी अंंध- शेतकरी तुकाराम बाबूराव रोकडे (मो.नं.९४२० ४३४६७१)यांना  जाणीव असल्याने,त्यांनी अनेक अडचणींवर  मात करत करत,आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील, तुळजापूर  तालुक्यातील आपसिंगा येथील डोंगरपायथ्यावरील उजाड माळरानावरील सुमारे तीन एकर शेतीत गेली वर्षभरात आंबा, चिंच, बेल, जांभळ, सिताफळ, आवळा,करंज,साग,कवट, कन्हेरी, नारळ, सागरगोटा ,पिंपळ,वड आदी ५०० वृक्षांच्या रोपांची लागवड आणि संगोपण करुन भांबावलेल्या शेतकर्‍यांसमोर एक डोळस आदर्श निर्माण केला आहे.समाज आणि शासनाने या धडपडीची आस्थेने दखल घेवून,त्यांना अधिक चालना देण्याची गरज आहे...
पडीकचा शिक्का मिटवला
तुकाराम बाबुराव रोकडे हे मुळचे आपसिंगा,ता.तुळजापूर येथील रहिवासी असून, बाभळगाव रोड लातूरच्या म्हाडामध्ये राहतात.ते वनौषधींचे जाणकार असून,नाडीपरिक्षण करुन,जुन्यासह अगदी कॅन्सरवर वनौषधींने मात करता येते असा दावा करतात.आजारासाठी औषधं लागतात, त्यासाठी वनौषधी लागतात,यामुळे ते झाडांशी अधिक जवळ गेले.घराचे अंगण असो माळवद त्यावर ते लहानमोठ्या वृक्षांची लागवड करत असतात.त्यांची आपसिंगाच्या पश्‍चिमेकडील वरवटी-आपसिगा रोडवर,उजाळ डोंगर पायथ्याला साडेचार एक वडिलोपार्जित शेती आहे.त्या माळाच्या पायथ्याशी आलेल्या समतल शेतीत त्यांनी पंचायत समितीच्या योजनेतून विहीर घेतली.त्याला चाळीस फुटावर चांगले पाणी लागले,त्यावर मोटार बसवून पाचशे मीटरचे पाईपलाईन केली.माळ व उतारावरील अधीर्र् शेती  अनेक वर्षांपासून पडीकच होती.जसे शेजार्‍यांचीआहे तशी..
पहिल्या वर्षी दोनशे रोपटे लावली.
रोकडे यांना रेेडिओ ऐकण्याची आवड असून,ती ऐकता ऐकता त्यांना वनीकरणाकडून वृक्षाची लागवड,संगोपणासाठी अनुदान मिळते असे समजले तेव्हा पासून ते झपाटून कामाला लागले, आता त्यांना आपलेे माळरान खुणावू लागले आणि त्यांनी तिकडे धाव घेतली.लातूरहून धडपडत एसटी च्या बसने कधी,ऑटोरिक्षा करुन ते आपसिंगाला जावू लागले.जून-जुलै  २०१९ मध्ये त्यांनी तुळजापूर सामाजिक वनीकरण खात्याकडे रोपंासाठी पाठपुरावा केला. खा.ओमराज निंबाळकर यांच्या मदतीने गतवर्षी वनीकरणाकडून दोनशे झाडांची  रोपटी मिळवली.रेंजर मनोहर पुंंड यंानी याकामी मदत केली.पांडुरंग चोैगुले यांच्या जेसीबीने जवळपास दोन एकरावर त्यांनी अडीच बाय अडीच बाय अडीच चौरस फुटांचेे खड्डे घेतले.प्रा.डॉ.सुरेश सोनोने यांच्या सहाय्याने, शेजारी बाळू बिडवे, माजी वनीकरण अधिकारी विलास म्हेत्रे, लिंबाजी सरडे, लक्ष्मण  रोकडे यांच्या मदतीने आंबा,चिंच,पिंपळ, जांभळ,वड, आवळा,साग,करंज आदींच्या या रोपट्याची लागवड केली.
उत्साह दुणावला...
एकदाची फुट-दोन फुटांची झाडे लावली,आता तिचे संगोपन करणे,पाणी घालण्याचा प्रश्‍न होता.शेतीत विहीर आणि पाणी.मात्र,अर्धवट पाईपलाईन मुळे या झाडांना पाणी देता येत नाही,आणि पाईपलाईनसाठी पैसा नाही. मग त्यंानी रोडलगत एक हौद बांधून घेतला.त्यात टँकरने पाणी साठवायचे .वनीकरणाकडून काही अनुदान मिळत गेले.ते अधिक काही पदरमोड करत त्यांनी गेली वर्षभर रोजगारी लावून या झाडांना पाणी दिले.हा हा म्हणता या रोपट्यांनी जीव धरला..ती खड्याबाहेर डोकावू लागली,त्यांंची तुकारामांंना माहिती झाली..त्यांंंना अधिक उत्साह  दुणावला..
आणखी दोनशे रोपट्यांची लागवड
गतवर्षी केलेली धडपड कामी आली.लावलेली झाडे जगली,जगवली आता उरलेल्या पडीक जमिनीवरही झाडे लावण्याचा रोकडेंनी निर्धार केला.कृषी राज्यमंत्री बच्चू कडू, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांंच्याशी पत्रव्यवहार केला.पुन्हा मग सामाजिक वनीकरणाकडे पाठपुरावा सुरु झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात मार्चपासून लॉकडाऊन होते,घराबाहेर पडणेही अवघड पण मनात केलेला निर्धार रोकडेंना बसू देत  नव्हता,कधी नातलग,कधी मित्राची मोटारसायकल तर कधी ऑटोरिक्षा करुन त्यांनी लातूर-तुळजापूर-आपसिंगा-उस्मानाबाद असा प्रवास करत राहिले, अर्थात यासाठी अधिक पैसाही खर्च करावा लागला.आर्थिक चणचण होतीच .सेवानिृवत्त कर्मचारी कुंंडलिक गोरे यंानी उसनवारीचा हातभार दिला, जुलै २०२० अखेर जेसीबीने आणखी दोनशे खड्डे  पाडून घेतले.,रंेंजर पुंड यंाच्याकडून ऑगस्ट २०२० च्या पहिल्याच आठवड्यात आणखी दोनशे रोपटे मिळवली.रोपटी तर आली...पण  लावण करण्यासाठी लॉकडाऊनमुळे लातूरहून आपसिंगाला जाणे -येणे अवघड झाले..दुसरा आठवड पावसाने ओढ दिली.आता  कशी लागवड करायची,पैसा नाही तो प्रश्‍न त्यांना सतावू लागला पण धडपडणार्‍यांच्या मदतीला कोणीतरी धावून येतो तसे माजी वनअधिकारी विलास म्हेत्रे यांनी आपल्या पाईपलाईनने रोकडेंच्या हौदात पाणी भरुन दिले आणि ,लिंंबाजी सरडे,बाळू बिडवे, लक्ष्मण  रोकडे  यांनी झाडे लावून घेतली.गतवर्षींची आणि यंदाही जवळपास पाचशे झाडे  पुढील दोनतीन वर्षात बहरली तर या माळरानावर एक आदर्श वृक्ष लागवडीचा नमुना पहायला मिळणार आहे..पण मेहनत आहे..ती रोकडे करतील,संबंधित खात्यानेही,शासनानेही त्यांना मदत द्यायला हवी.
पाऊसही धावून आला..
गेल्या आठवड्यात गायब झालेला पाऊस तिसर्‍या आठवड्यात फिरुन आला.या नव्या रोपट्यांना तो  एकप्रकारे वरदानच ठरला.रोकडेंचा आनंद गगणात मावेना, जून पासून रोकडेंनी मला त्यांच्या शेतात त्यंानी केलेल्या, धडपडीचंं झालेलं चिज बघायला चला,असा लकडा लावला होता.अखेर १६ ऑगस्टला मी वेळ  काढला.बाराशे रुपये  भाड्याचा एक ऑटोरिक्षा करुन आम्ही बार्शी रोडने निघालो पावसाची रिपरिप सुरु होतीच.वाटेने मी अनेक जागी थांबून वैद्यराज तुकाराम रोकडेंना झाडे,वेलींची माहिती विचारत असे..उस्मानाबादहून सात किलोमीटर अंतरावरील त्यांच्या चोहोबाजूंनी डोंंगर आणि आतत्या घाटमाथ्यावरील शेतीत दाखल झालो.त्यांच्या अंध सुनिता पत्नीने पहाटे तीन वाजता उठून करुन दिलेल्या भाकरी,सुकी मसूर डाळ,शेंगदाण्याची चटणी, लोणच्याचा मनसोक्त आस्वाद घेतला.भिरभिर पाऊस चालूच होता.. मग   लक्ष्मण रोकडे, दत्ता गोरेसह जुने आणि नवीन झाडांची लागवड पाहात निघालो.गतवर्षींची झाडे  गुडघ्याएवढी  आलेली आहेत. पूर्वेला समतल जमिनीत सोयाबीन डोलत  होता. विहीरीत काळेशार पाणी खुणावत होतं.बांधावर लावलेली चाफा,जटाशंकरच्या वेलीला रोकडे चाचपून पाहात होते. पूर्ण शेतीला आमची चक्कर झाली.या भागात घेवडा, लोखंडी, घुटबोर, टणटणी, जखमजोडी ,तालीमखाना, रानतिळवण , वाकळ, मुकणी, तरवटा,दुधानी, पांढरफळी ,शेलवट, उन्हाळी, चारं, कावळीच्या मुळ्या,गवत अशा या भागातील रानझाडं, वेलांचं दर्शन झालं.अंध वैद्यराज तुकाराम रोडकेंची डोळस धडपड प्रत्यक्ष पाहता आली.रोकडेंनी इंदिरा आवास योजनेतून घरकुल मिळवून शेतीत उभारणी चालवलीय पैशाअभावी ती थांबलीय. माजी वन अधिकारी विलास म्हेत्रे यांची येथे भेट होवून झाडांविषयी चर्चा झाली.चार वाजेनंतर आम्ही पुन्हा ऑटोरिक्षाने तुळजापूरहून लातूरच्या दिशेने निघालो दमदार पावसांच्या सरीच्या साथीनं...पुढं चौथा आडवडाही लातूर -उस्मानाबाद जिल्ह्यात भीज पावसाने हजेरी लावून पिकांना आधार दिला.रोकडेंच्या रोपट्यांंना तोे अधिक लाभदायक ठरलाय.
आर्थिक मदतीची गरज..
आंधळ्या तुकाराम रोकडेंनी विविध प्रकारची सुमारे पाचशे देशी झाडांची लागवड करुन संगोपणाचे अवघड काम हाती घेतले आहे, त्यामध्ये त्यांना शतावरी,अश्‍वगंधा ,सावरी अशा औषधींचे आंतरपीक घ्यायचे आहे.त्यांंची पाईपलाईन,घरकुल अर्धवट आहे, त्यासाठी जवळपास एक लाख रुपयांची नितांंत गरज आहे,कोणी दानशुरांनी  मदत केली वा जाणकारांनी हातउसने दिलेे तर त्यांंचे पुढील सर्व प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.
आर्थिक संकटं दूर होतील
एकीकडे,अलिकडे मराठवाड्यातला शेतकरी कधी दुष्काळ,कधी अवर्षण,अधी अतिपावसाने ,कधी बियाणे उगवलेच नाही म्हणून हतबल होतो आहे,कर्जबाजारी होवून जीवनच संपवून कुटूंबाला वार्‍यावर सोडत असल्याचे पहायला मिळते आहे, अशा  वेळी तुकाराम रोकडेसारखा अंध माणूस डोंगर रांगांना पान्हा फोडून  वृक्ष लंागवड करुन, जगण्याचा आणि जगवण्याचा आधार देत डोंगरसासाखा उभा आहे.त्यांच्या सारखी या मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी आपल्या पिकावू, पडीक, माळरानातील जमीनीवर अशाप्रकारे वृक्ष लागवड केली तर मोठ्या प्रमाणावर फळाचे उत्पादन होईल,पैसा मिळंल. पर्यावरण रक्षणाला मोठा हातभार लागून, अवघ्या मानव जातीवर पर्यावण बदलामुळे आलेले संकट दूर व्हायला हातभार लागणार आहे एवढे निश्‍चित..
बाळ होळीकर,लातूर
मो.नं.९७६६१२९०६८





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या