नागरीकांनी पूर परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन
· पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोली,दि.11: नागरीकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर आपत्ती पासून स्वतःचा बचाव करावा याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन केले आहे. राज्यात तसेच जिल्ह्यात दिवसें-दिवस पावसाचा जोर वाढतअसून नद्यांची पात्रे भरून वाहत आहेत. तसेच येलदरी धरण 91.84 टक्के तर सिध्देश्वर धरण 66.14 टक्के भरले असून खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडल्यास येलदरी व सिध्देश्वर धरणातून पाणी सोडावे लागेल व त्यामुळे पुर्णा नदीची पात्रे भरुन वाहू शकतात यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तथापि पूर्णा नदी व जवळील नाले,ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
नागरिकांनी गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पुराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावे, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतूनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पुर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावे. घर सोडून जातांना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जावे. कुंटूंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्यावी. पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करावा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करावा.), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर त्यास दोरीच्या सहाय्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा, पुर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सुचनांचे पालन करा, तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्र.०२४५६-२२२५६० या क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नये. पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका. तसेच पुर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करून नका. दुषित,उघड्यावरील अन्न- पाणी टाळा शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा. सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरीचीत व खोल पाण्यात जावू नका असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.