कोरोना प्रतिबंधासाठी पालिकेची विशेष तपासणी मोहीम
१५ ऑगस्ट पूर्वी तपासणी
करून घेणे बंधनकारक
हॉट स्पॉट भागात होणार तपासणी
लातूर/ प्रतिनिधी:कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दिनांक १५ ऑगस्ट पूर्वी तपासणी करून घेणे बंधनकारक असून त्यासाठी विविध सेवामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, व्यापारी, फेरीवाले, शासकीय अधिकारी कर्मचारी यांची अँटीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
लातूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही विविध सेवा बजावणाऱ्या विभागातील असंख्य अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत.अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच त्यांचा कुटुंबियांना कोरोनाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी या सर्वांच्या ॲंटीजन तपासण्या प्राधान्याने करण्याच्या सूचना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त देविदास टेकाळे यांनी तपासणी मोहीम आखली आहे.
याअंतर्गत शहरातील सर्व हॉटस्पॉट मधील प्रत्येक घरातील व्यक्तींची व शासकीय व खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञ, आरोग्य सेवक,औषधी विक्रेते, पोलीस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, भाजीपाला तसेच फळे व दूध विक्रेते, पेट्रोल पंप व गॅस एजन्सीचे कर्मचारी, बँकेतील अधिकारी व कर्मचारी,किराणा दुकानदार, पाणी व बर्फ विक्रेते, ऑटोरिक्षा चालक, स्वस्त धान्य दुकानदार, आडत दुकानदार, हमाल -मापाडी, वकील व इतर व्यापारी यांच्या चाचण्या प्राधान्याने केल्या जाणार आहेत.
शहराला सेवा देणाऱ्या या सर्व घटकांना कोरोनामुक्त ठेवणे हे चाचण्या करण्यामागचे ध्येय आहे. दिनांक १५ ऑगस्ट पूर्वी या चाचण्या पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिले आहेत. शहरातील या सर्व घटकांनी चाचण्यांसाठी स्वतः पुढे यावे. चाचण्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन परिसर, कव्हा रोड येथील विलगिकरण केंद्र, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन औसा रोड येथील विलगीकरण केंद्र, शिवछत्रपती ग्रंथालय डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क याठिकाणी चाचणी केंद्र सुरुवात करण्यात येत आहेत.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुधा राजूरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दिनांक १५ ऑगस्ट पर्यंत या चाचण्या करून घेणे बंधनकारक असणार आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.