शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी
औसा/प्रतिनिधी: खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद व मूग ही तीनही पिके हातची गेली असून त्याची भरपाई म्हणून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन रयत परिषदेच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावर्षी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कोरोना संकटाच्या काळातही उसनवारी करून नगदी पीक असणाऱ्या सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची लागवड केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. अतिवृष्टीच्या अस्मानी संकटामुळे हाताशी आलेले पीक वाया गेले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेतातच कोंब फुटले आहेत.उडीद व मूग पूर्णपणे वाया गेले आहेत.खरिपाची सर्व पिके पूर्णपणे हातून गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई म्हणून द्यावेत अन्यथा दि.२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, बहुजन रयत परिषदेचे राजीव कसबे, नागेश मुगळे,व्यंकट घंदुरे,साहेबराव पाटील, सिद्धार्थ रसाळ,नवनाथ भोसले, दगडू बर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.