अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
यांच्याकडून आढावा
नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याचे निर्देश
आगामी काही दिवस शेतकरी, नागरिक, प्रशासनाने दक्ष राहण्याचे आवाहन
लातूर प्रतिनिधी : २१ सप्टेंबर २० :
मागच्या आठवडाभरात लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे व इतर नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा, जनतेला दिलासा द्यावा असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
मागच्या आठवड्यात लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी व त्यातून नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी रविवारी प्रशासनातील अधिकार्यांशी संपर्क करून आढावा घेतला, या काळात औसा, निलंगा, शिरूर आनंतपाळ, उदगीर, जळकोट, देपणी, अहमदपूर रेणापूर, चाकूर, लातूर या दहाही तालुक्यातील काही गावे व परिसरात अचानक अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन व इतर पिकांची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीनची झाडावरच उगवण होत आहे. याशिवाय काही ठिकाणी नदीनाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे नुकसान झाली आहे. शेतातील माती तसेच अवजारे वाहून गेली आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भातील माहिती घेऊन पालकमंत्री ना. देशमुख यांनी निवासी जिल्हाधिकारी ढगे यांच्याशी चर्चा केली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्यात यावा असे निर्देश दिले आहेत.
चौकट
बॅरेजमधून पाणी सोडण्यात झालेल्या दिरंगाईच्या चौकशीचे दिले आदेश
मागच्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मांजरा, रेणा, तावरजा, तेरणा या नद्यांवर उभारलेल्या सर्वच बॅरेजमध्ये पाणी आले आहे. कारसा-पोहरेगाव तसेच खरोळा बॅरेजेसचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे शेतात पाणी जाऊन खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. सदरील दिरंगाई बाबत संबंधितांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश, पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत पुढचे काही दिवस पावसाच्या असल्यामुळे पाटबंधारे विभाग तसेच शेतकऱ्यांनीही या काळात दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.