वृषाली पाटील यांच्या बालकादंबर्‍यातून वैज्ञानिकतेचा जागर - डॉ.राजशेखर सोलापुरे

 

वृषाली पाटील यांच्या बालकादंबर्‍यातून वैज्ञानिकतेचा जागर 
- डॉ.राजशेखर सोलापुरे





लातूर - सोशल माध्यमांच्या आणि मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या बालकांवर ग्रामसंस्कृतीच्या मुल्यांचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार करणार्‍या व जागर घालणार्‍या दोन बालकादंबर्‍या म्हणजे वृषाली पाटील लिखित ’अंधारातील डोळे’ आणि ’पक्षी गेले कुठे ?’ या आहेत, असे प्रतिपादन ख्यातनाम वक्ते व लेखक डॉ.राजशेखर सोलापुरे यांनी केले.
भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात सोमवारी संपन्न झालेल्या वृषाली विक्रम पाटील लिखित अंधारातील डोळे आणि पक्षी गेले कुठे ? या दोन बालकादंबर्‍यांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अनुवादक व साहित्यिक डॉ.सूर्यनारायण रणसुभे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून लेखिका सुनिता आरळीकर, प्रा.विक्रम पाटील, बालकादंबरीकार वृषाली पाटील आणि डॉ.दुष्यंत कठारे हे होते. 
पुढे बोलताना डॉ.सोलापुरे म्हणाले की, बालकांची जिज्ञासा जागृत करण्याची व्यवस्था प्रत्येक घरातून निर्माण झाली पाहिजे तरच आभासी जगात गुंतणार्‍या बालकांना माणूसपणाचे शिक्षण देता येईल. ग्रामीण शब्द व संस्कृती ही आज हरवत चालली आहे. त्याचे कारण ग्रामीण शब्दांशी बालकांचा परिचय नाही त्यांची नाळ गावासोबत आणि मातीसोबत जोडण्यासाठी बालकादंबरीतून प्रयत्न झाले पाहिजेत. बालकांना अंधश्रद्धेच्या गर्तेत जाऊ द्यायचे नसेल तर त्यांना विज्ञानाचे धडे द्यावे लागतील आणि ते साहित्यातून दिले गेले तर त्यांचे भावविश्व समृद्ध होऊ शकेल. 
अध्यक्षीय समारोपात डॉ.सूर्यनारायण रणसुभे म्हणाले की, बंगाली भाषेत विपूल प्रमाणात बालसाहित्य आहे. मराठीत बालसाहित्य हे सकस स्वरूपात उपलब्ध नाही. साहित्यिकांनी आपल्या लेखनीतून असे बालसाहित्य साकारावे. बालसाहित्य लिहीणे ही अवघड गोष्ट आहे. मराठी लेखकांनी याकडे लक्ष द्यावे. या प्रसंगी सुनिता आरळीकर यांचेही भाषण झाले. 
वृषाली पाटील यांनी लेखनामागील भूमिका व्यक्त करताना यातील अंधारातील डोळे ही कादंबरी सत्य घटनेवर अवलंबून आहे तर पक्षी गेले कुठे ? ही कादंबरी कॉर्क ल्यूसी यांच्या सिद्धांतावर आधारलेली आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेजा कारंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश पाटील यांनी केले.

छायाचित्र ओळ
वृषाली विक्रम पाटील लिखित अंधारातील डोळे आणि पक्षी गेले कुठे ? या दोन बालकादंबर्‍यांच्या प्रकाशन करताना डॉ.सूर्यनारायण रणसुभे, डॉ.राजशेखर सोलापुरे, सुनिता आरळीकर, प्रा.विक्रम पाटील, वृषाली पाटील आणि डॉ.दुष्यंत कठारे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या