*मृतदेहाच्या आदलाबदली बाबत अधिष्ठाताचा खुलासा व्यवस्थापनाच्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी*
*शवविच्छेदन गृहात मृतदेहावर मयताच्या नावाचे फलक लावा...*
-- *लोकाधिकार संघाची मागणी.*
लातुर : दि.७ - लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाची आदलाबदल होऊन दि. ६ मे रोजी प्रशासनाच्या नालायकपणाचे आणी गलथान व्यवस्थापनाचे पुरते धिंडवडे निघाले आहेत.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या दोन मृतदेहात नातेवाईकांच्या ताब्यात देताना बदल झाल्याने अंत्यविधी केलेला मृतदेह जेसीबीने उकरून काढावा लागला. यास जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी लोकाधिकार संघाने केली आहे.
शेळगाव येथील मयत धोंडीराम तोंडारे यांच्या नातेवाईकांकडे हातोला येथील मयत आबासाहेब चव्हाण यांचा मृतदेह देण्यात आला होता.
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मधील हा तमाशा, व्यवस्थापन काय मारताय माशा ! असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे.
तोंडारे यांच्या अंतिम संस्काराच्या परंपरेनुसार मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता. म्हणून ते प्रेत बाहेर तरी काढण्यात आले. शेळगाव येथे घेऊन गेलेल्या मृतदेहावर जर अग्निसंस्कार झाले असते तर किती अवघड प्रश्न निर्माण झाला असता ? असा ही मुद्दा पनाळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच भविष्यात असा प्रकार होऊ नये यासाठी लातूरच्या शासकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहात मृतदेहावर मयताच्या नावाचे फलक लावाण्यात यावेत. अशीही मागणी लोकाधिकार संघाने केली आहे.
मृतदेहाच्या झालेल्या आदलाबदली बाबत अधिष्ठाता यांनी केलेला खुलासा अत्यंत हास्यास्पद आहे. मृतदेह ताब्यात देण्याची जबाबदारी कोणाची आहे ? मृतदेह ताब्यात देताना ताबा पावती घेतली जाते की नाही ? मृतदेह घेऊन जाताना शवविच्छेदनगृहात शासकीय कर्मचारी असतात की नाही ? शासकीय महाविद्यालयात असलेली सुरक्षा यंत्रणा काय देखाव्यासाठी आहे का ? का या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केवळ फोटो काढू नका, व्हिडिओ शूटिंग करू नका एवढे म्हणण्यासाठीच ठेवलेले आहे. शासकीय महाविद्यालयाच्या गलथानपणाचे वाभाडे काढणाऱ्या पत्रकारांना फोटो व शूटिंग काढण्यापासून मज्जाव करण्यासाठी ही सुरक्षा यंत्रणा आहे का ? वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे फोटो आणि शूटिंग करणे यावर प्रतिबंध करण्यात व्यवस्थापनाचा कसला पुरुषार्थ आहे ? मयताच्या नातेवाइकाकडून चुकून दुसरा मृतदेह नेण्यात आला, असे लिहून घेणे यातच अधिष्ठाताच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे की काय ? असा टोला लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाताना मारला आहे. असा चुकीचा खुलासा करून स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे काम अधिष्ठाता करीत असल्याचे पनाळे यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.