विभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने
ऑक्सिजन टँकरचालक भारावले
औरंगाबाद,दि. 17:- (विमाका) :- ऑक्सिजन टँकर चालकांच्या अथक परिश्रमाने तसेच अविरत वाहन चालवून नियोजित ठिकाणी आणि नियोजित वेळेत ऑक्सिजन टँकर पोहचवून एक प्रकारे ऑक्सिजन टँकर चालक हे कोरोनारुग्णांसाठी देवदूत ठरले असून यांच्यामुळेच रुग्णांचे प्राण वाचले असल्याचे गौरवोद्गार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काढले. निमित्त होते कोरोना संकट काळात महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ऑक्सिजन टँकर चालकांच्या सत्काराचे, हा अनौपचारिक सत्कार विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानी आज पार पडला.
या सत्कारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, अप्पर आयुक्त अविनाश पाठक, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उपायुक्त पराग सोमण, अन्न् व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे, उपायुक्त विणा सुपेकर, मागासवर्गीय कक्षाचे उपायुक्त शिवाजी शिंदे, उपायुक्त (सा.प्र.वि.) जगदीश मनियार, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, संगीता सानप यांची उपस्थिती होती.
मराठवाडा विभागात कोरोना सारख्या संकट काळात देखिल ऑक्सिजनची कमतरता येऊ न देता उत्तम प्रकारे कोरोनाकाळ हाताळला गेला असे सांगून श्री.केंद्रेकर म्हणाले की, सर्व सोईसुविधांसह जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयातून उत्तम प्रकारे कोरोनाकाळात जबाबदारीने कर्तव्य पार पाडले आहे. त्यात ऑक्सिजन टँकरचालकांचा मोठा वाटा असून या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणजे मराठवाड्याची उपचाराबाबत चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे.
मराठवाडा विभागात ऑक्सिजनचा वापर, बेड उलब्धता, रेमडिसिवीरची उपलब्धता आदी आरोग्य साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. याबरोबर योग्य नियोजनामुळे कोरोना संसर्गाच्या संक्रमणाच्या प्रतिबंधाकरीता प्रशासनाला यश आले आहे, असे सांगून श्री.केंद्रेकर यांनी यावेळी टँकर चालकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच कर्तव्यावर असताना टँकरचालकांना आलेले अनुभव देखिल जाणून घेऊन त्यांच्याशी मुक्तसंवाद साधला.
कोरोनाकाळात प्रत्येक छोट्या घटकातील छोट्या माणसांनी मोठी कामे केली आहे आणि याचे जिवंत उदाहरण म्हणजे ऑक्सिजन टँकरचालक असे सांगून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, ऑक्सिजन टँकरचालकांचे काम हे वाखणण्यासारखे आहे, त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर आपण यशस्वी मात करु शकलो.
मराठवाड्याच्या मातीमध्येच सहकार्याची भावना रुजलेली आहे आणि आपल्या सारख्याच्या काम करण्याच्या धडपडीनेच इतरामध्येही आपण देखील समाजाचे ऋण फेडले पाहिजे ही भावना वृध्दींगत होण्यास मदत झाली असे बोलून श्री.चव्हाण यांनी टँकरचालकांच्या प्रती गौरवोद्गार काढले. तर मनपा आयुक्त श्री.पांण्डेय यांनी कोरोना काळात अन्य देशांमध्ये ज्या घटना झाल्या सुदैवाने आपल्याकडे नियोजन असल्यामुळे अप्रिय अशा घटना घडल्या नाही, त्याचबरोबर ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोना सारखी लढाई जिंकू शकलो.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे ऑक्सिजचा योग्य नियोजनामुळे तुटवडा भासला नाही आणि आगामी तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज आहे.
सत्काराला उत्तर देतांना ऑक्सिजन टँकरचालक राजू जोगदंड म्हणाले की, प्रशासनाने आमची दखल घेतल्याने आम्ही भारावलो आहोत. या काळात आम्ही जीव लावून अविरत काम केले परंतु या कामाचे मोल झाल्याचे आम्हाला समाधान आहे.
यावेळी श्री.केंद्रेकर यांच्या हस्ते अपर विभागीय आयुक्त अविनाश पाठक, उपायुक्त विना सुपेकर, यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर राजू जोगदंड, दिनेश चिंचने, राम खटले, माधव गवई, दीपक गोर्डे, ऋषी वाणी, विष्णू बहीर, ज्ञानेश्वर निकाळजे, दीपक आलदाट, सय्यद निसार या ऑक्सिजन टँकरचालकांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
******
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.