खुनाच्या घटनेतील मुख्य आरोपींना काही तासातच अटक. वरिष्ठांचे मार्गदर्शनात चाकूर पोलिसांची कामगिरी.*



              *खुनाच्या घटनेतील मुख्य आरोपींना काही तासातच अटक. वरिष्ठांचे मार्गदर्शनात चाकूर पोलिसांची कामगिरी.*




लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

            या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस ठाणे चाकुर हद्दीतील आष्टा-मोहदळ शिवारात दिनांक 13/12/2021 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक पुरुष जातीचे अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले.चाकूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे यांचे निर्देशान्वये,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे सूचनेनुसार सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांनी पोलीस स्टेशन,चाकुर चे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सदर पथकाला तपासाबाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले.



                 सदर पथकाने चाकूर शहरातील नागरिकांच्या मदतीने मयताची ओळख निष्पन्न केली असता सदरचा मयत हा चाकूर येथील हनुमंत वेंकट येरवे,वय 40 वर्ष हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर पथकाने नमूद मयताच्या खुनाच्या कारणाचा व मारेकरीचा शोध घेताना पथकाला माहिती मिळाली की,नमूद मयताचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते.त्यावरून सदर महिलेस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरची महिला तिचे पती पासून विभक्त राहत होती व हनुमंत येरवे हा सदर महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होता. मारहाण करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून हनुमंत येरवेला ठार मारण्याच्या उद्देशाने सदर महिलेने त्याच्या ओळखीचे आणखीन दोन व्यक्तींच्या मदतीने कट रचून दिनांक 12/12/2021 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास मोहदळ- आष्टा शिवारात निर्जन ठिकाणी बोलावून घेऊन हनुमंत येरवे याचे डोळ्यात मिरची पावडर टाकून, डोक्यात जाड लोखंडी रॉड ने मारून त्यास जागीच ठार मारले असे सांगितले. 

               त्यावरून नमूद घटनेतील हनुमंत येरवे याच्या खुनाच्या कटात सामील असलेले इसम नामे

1) संतोष धोंडीराम घाडगे, वय-25 वर्ष, व्यवसाय-शेती ,राहणार शिवनखेड, तालुका चाकूर. 

2) लक्ष्मण बब्रुवान डांगे, वय 38 वर्ष, व्यवसाय-शेती ,राहणार-आष्टा तालुका चाकूर.

यांना दिनांक 13 व 14/12/2021 रोजीच्या मध्यरात्री त्यांचे राहते ठिकाणाहून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे खुनाच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता नमूद महिलेच्या सांगण्यावरून त्यांनी हनुमंत येरवे यास लोखंडी रॉडने डोक्यात मारून खून केल्याचे कबूल केले.

             त्यावरून आज दिनांक 14/12/2021 रोजी नमूद आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन, चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 549/2021 कलम 302, 201, 34,120(ब) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आलेली असून नमूद आरोपींना मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


       गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी केला असून पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक श्री. निकेतन कदम हे करीत आहेत.

             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात  सहायक पोलिस अधीक्षक श्री.निकेतन कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी,चाकूर यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते,पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी,पोलीस अमलदार पिराजी पुठेवाड,हनुमंत मस्के, बाळू अरदवाड,सुकेश केंद्रे,दामोदर शिरसाट,महिला पोलीस अमलदार पुनम शेटे यांनी पार पाडली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या