*ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी....पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे ज्येष्ठांच्या मदतीकरिता स्वतंत्र कक्ष सुरू
लातूर (प्रतिनिधी )
काळाच्या ओघात लहान कुटुंब पद्धतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शिक्षणानंतर मुले नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी व्यवसाय नोकरी निमित्त मुलांचे बाहेर जाण्याचे प्रमाण कमी असल्याने आई-वडील मुलांसोबतच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत होते. परंतु अलीकडील काळात आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.
ज्या आई-वडिलांनी लहानाचे मोठे केले आर्थिक विवंचनेतून मुलांचे शिक्षण, संगोपन करून त्यांचे भविष्य घडविले, जे आई वडील उभ्या आयुष्यासाठी आपला आधारवड म्हणून पाठीमागे उभे राहिले. त्याच आई-वडिलांवर पोटच्या मुलांकडून पोरके होण्याची नामुष्की ओढवली जात आहे. जेव्हा स्वतःची मुलेच आपल्या वाईटावर उठून स्वतःच्या घरातून बेदखल करतात तेव्हा आई-वडील व ज्येष्ठांवर दुःखाचा डोंगर कोसळतो.
संपूर्ण आयुष्य मुलांच्या भविष्यासाठी संघर्ष केल्या नंतर आता कुठे शारीरिक व मानसिक निवांतपणा व उर्वरित आयुष्याचा आनंद घेण्याचे दिवस आलेत हे विचार मनाला सुखावून जात असतानाच या सुंदर स्वप्नांचा कडेलोट होऊन स्वतःही केंव्हा दुःखाच्या खाईत येऊन पडतो हे जेष्ठांना लक्षात देखील येत नाही.
आयुष्यभर आत्मसन्मानाने राहणाऱ्या आई-वडिलांवर जेव्हा हतबलता येते तेव्हा आपल्या व्यथा मांडायच्या तर कोणा पुढे हा प्रश्न उभा राहतो. आपल्या पुढील सर्व रस्ते आता बंद झालेत ही दुर्बलतेची जाणीव त्यांच्या मनात तयार होते.
समाजात बहुतेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसत असल्याने यालाच म्हातारपण म्हणतात किंवा आपल्या पूर्व जन्माची कर्माची फळे आहेत हा समज करून जेष्ठ मारून मुटकून अन्याय सहन करत असह्यपणे जीवन जगत असतात. म्हातारपणाचे हे अगतिक जीवन फक्त गरीब ज्येष्ठांच्या नशिबी आहे असे नाही तर समाजातील सर्व स्तरातील जेष्ठांच्या नशिबी कमी अधिक प्रमाणात हा वाईट अनुभव येत असल्याचे निदर्शनास येते.
आयुष्याच्या उतार वयात वृद्धत्व, आजारपण, शारीरिक व्याधी हळूहळू जीवन व्यापून टाकतात, आयुष्यभर ताठ मानेने चालता चालता पाठीचा कणा केव्हा वाकून जातो हे कळत ही नाही, अशावेळी अपत्यांनी काठी म्हणून आधार देणे अपेक्षित असताना काही वृद्धांच्या नशिबी मात्र वेगळीच व्यथा लिहिलेली असते.
संपूर्ण कुटुंबाचा व समाजाचा आधारवड असलेल्या जेष्ठांना त्यांचे अपत्य व नातेवाईकांचे कडून घरातून बाहेर काढणे, त्यांना वाऱ्यावर सोडणे, त्यांचा सांभाळ न करणे, त्यांना मिळकती मधून बेदखल करणे अशा अपराधांना प्रतिबंध करून आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे याकरिता शासनाकडून "आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, 2007" हा कायदा करण्यात आला आहे.
नमूद कायद्यानुसार जेष्ठांना त्यांच्या अपत्य व नातेवाईक यांची कडून होणारा त्रासाला वाचा फोडण्यासाठी तसेच ज्येष्ठांना उपजीविका चालावी म्हणून निर्वाह भत्ता मंजूर करण्यासाठी न्यायाधिकरण म्हणून जेष्ठ नागरिक राहत असलेल्या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी (SDM/प्रांताधिकारी) हे नियुक्त केलेले असतात. जेष्ठ नागरिक यांनी त्यांचे तक्रारीबाबत उपविभागीय अधिकारी (SDM /प्रांताधिकारी) यांचे कडे अर्ज केल्यास त्यांचे कडून संबंधित नातेवाईक यांना समन्स काढून ज्येष्ठ नागरिकांना निर्वाहता मंजूर करतात. न्यायाधिकरणाच्या निर्वाह भत्ता देण्याच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित आरोपीस कारावास किंवा द्रव्य दंड होऊ शकतो .
अडचणीत आलेल्या ज्येष्ठांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे कायदेशीर तरतुदी व त्यांचा हक्क अधिकार असताना देखील ते अडचणींचा सामना करीत जीवन व्यतीत करीत असतात. जेष्ठ नागरिकांना योग्य वेळी समुपदेशन व मार्गदर्शन मिळून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्री सोमय मुंडे,पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या संकल्पनेतून जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदरचा कक्ष भरोसा सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे सुरू करण्यात आला असून सदर कक्षामध्ये जेष्ठ नागरिक व त्यांचे नातेवाईक यांना बोलावून समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह भत्ता मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून संबंधित न्यायाधीकरणाकडे पाठविण्यात येतो. जेष्ठ नागरिक कक्ष सुरू झाल्या पासून एकूण १६ तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ९ अर्ज निकाली काढून उर्वरित अर्जावर सुनावणी चालू आहे.
याशिवाय जेष्ठ नागरिकांना त्यांच्या अडचणी किंवा कायदेशीर मदत, मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी भरोसा सेल पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे संपर्क करण्याचे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.