नियमीत कर्जफेड करणाऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान रखडले शेतकरी संघटनेकडून लाक्षणिक उपोषणाचा इशारा







नियमीत कर्जफेड करणाऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान रखडले 

शेतकरी संघटनेकडून
लाक्षणिक उपोषणाचा इशारा 

लातूर : नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा राज्यातील आघाडी सरकारने केली होती. पण अद्यापही हे अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारला आपल्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने दि १ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी दिला आहे. 
 राज्यातील थकबाकीदार  शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती.त्यानुसार थकित कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. याचवेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचीही घोषणा सरकारने केली होती. परंतू अनेक महिने झाले तरी अद्याप ही रक्कम देण्यात आलेली नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 
   आपली पत जपण्यासाठी अनेक शेतकरी उधार उसनवारी करून नियमित कर्जफेड करतात पण त्याचा कसलाही लाभ होत नाही उलट कर्ज थकवणाऱ्याना लाभ मिळतो अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. 
सध्या पेरणीचा कालावधी आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत पण त्यासाठी अनेकांनी उधारी केलेली आहे. किमान अशा अडचणीच्या काळात तरी हे अनुदान मिळावे अशी शेतकऱ्यांची भावना आहे. सरकारने ३० जून पर्यंत रक्कम खात्यावर जमा केली नाही तर दि १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा राजेंद्र मोरे आणि राजकुमार कसबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या