वृक्ष संवर्धनात प्रत्येकाने योगदान द्यावे :पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे




वृक्ष संवर्धनात प्रत्येकाने योगदान द्यावे :पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे
'वसुंधरा वृक्ष संवर्धन'हेल्पलाइनचे उदघाटन; वृक्षारोपण उपक्रम

लातूर - लातूर जिल्ह्यात वनांचे क्षेत्र वाढविणे काळाची महत्त्वाची गरज आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन कार्यात प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

वसुंधरा प्रतिष्ठान आणि संगम हायटेक नर्सरी यांच्या वतीने 'वसुंधरा वृक्ष संवर्धन' हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांची उपस्थिती होती. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, संगम हायटेक नर्सरीचे संचालक संगमेश्वर बोमणे, मनोहर कोरे, भाजपचे सुधीर धुत्तेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना संजय बनसोडे म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने यावर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संगोपन कार्य हाती घेण्यात आले आहे. वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था लातूर जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करीत आहे. मी फार दिवसांपासून यांचे कार्य आणि नाविन्यपूर्ण संकल्पना पाहतोय. या कार्यात प्रतिष्ठानला माझे पूर्णपणे सहकार्य असेल. आज सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाईनमुळे ज्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यात येत असलेली अडचण दूर होण्यास मदत होईल. या मोफत हेल्पलाईनचा संबंध मराठवाड्याला फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले.



प्रस्ताविकपर भाषणात वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा म्हणाले, वसुंधरा प्रतिष्ठान ही संस्था गत सहा वर्षांपासून लातूर जिल्हयासह नागपूर, सोलापूर येथे कार्यरत आहे. या कालावधीत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून निसर्ग संवर्धन ही लोकचळवळ करण्यात आली आहे. या हेल्पलाईनमुळे वृक्षारोपण कसे करावे, माती कोणती वापरावी, रस्त्याच्या कडेला कोणती झाडे लावावीत, खत कोणते वापरावे, फळझाडांची लागवड कशी करावी, कमी पाण्यावर येणारी झाड कोणती याची माहिती फोनद्वारे दिली जाणार आहे. 

अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे म्हणाले, वसुंधरा प्रतिष्ठान आणि संगम हायटेक नर्सरी यांनी लातूर जिल्ह्यात वृक्षारोपण आणि संगोपन कार्यात मोठे योगदान दिले आहे. ट्री अबुलन्स ही संगम हायटेक नर्सरीची संकल्पना देशभर गाजली. आता त्याचे अनुकरण होते आहे. वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था लातूरला हरित करण्याचे ध्येय घेऊन ते साध्य करण्यासाठी धडपडत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक यांनी केले तर शेवटी आभार संगमेश्वर बोमणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे सचिव रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, संघटक प्रशांत स्वामी, सदस्य अभिजीत स्वामी, नितीशा उबाळे आदींनी परिश्रम घेतले.



एक कॉल करा, 
हवी ती माहिती मिळवा.....
===================
वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईन द्वारे अर्थात एका फोनवर हवी असेल ती माहिती दिली जाईल. लातूरला वनक्षेत्र वाढावे यासाठी ही सुविधा मोफत सुरू करण्यात आली. 9326551448 या क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत कॉल केल्यास माहिती दिली जाणार आहे.

बोधी वृक्षांची लागवड
================
वसुंधरा प्रतिष्ठान आणि संगम हायटेक नर्सरी यांच्या वतीने बोधी वृक्ष अर्थात पिंपळ झाडाची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड अभियानाचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या