लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अधिष्ठाता यांना कारणे दाखवा नोटीस
कोविड उपचाराचे औषध विकत आणण्यास सांगितले
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
मुंबई, दि. 19-
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णाला महागडे औषध बाहेरून आण्याचीची शिफारस केल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राज्यात कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या सर्व रुग्णांवर शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे मात्र असे असूनही कोविड उपचारासाठी आवश्यक असलेले Tossilizumab हे महागडे औषध लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातून रुग्णास बाजारातून विकत आणण्यास सांगण्यात आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतल्याने वैद्यकीय शिक्षण संचालकांनी अधिष्ठाता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
लातूर येथे घडलेली ही बाब अतिशय गंभीर असून शासनाच्या आदेशाचे आणि धोरणाचे उल्लंघन करणारी आहे त्यामुळे अधिष्ठाता यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमा नुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण तीन दिवसात मागितले आहे.
या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संबंधित रुग्णाची गैरसोय झाली असून अशा घटना पुनश्च घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले असून या रुग्णावरील उपचाराचा सर्व खर्च शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शासनामार्फतच करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.