बोगस बियाणे विकणार्‍यावर कारवाई करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर







बोगस बियाणे विकणार्‍यावर कारवाई
  करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.23/06/2020
जिल्ह्यातील लातूर, रेणापूरसह निलंगा, अहमदपूर, चाकूर ,शिरूरअनंतपाळ या भागातील शेतकर्‍यांनी आपल्या शेतात कृषी दुकानदारांकडून नामांकित कंपन्याचे सोयाबीन बियाणे खरेदी करून आपल्या शेतात त्या बियाण्याची पेरणी केली. पेरणीला आठवडा उलटला तरी बियाण्याची उगवण झालीच नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे सोयाबीनचे बोगस बियाणे निर्माण करणार्‍या कंपनीची चौकशी करून दोषी कंपन्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच नुकसानीची पाहणी करून शेतकर्‍याला तात्काळ एकरी 25 हजार रूपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कृषी मंत्री दादाजी भूसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
यावर्षी जुनच्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस झालेला आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरण्या लवकर केलेल्या आहेत.परंतू सातदिवस झाले तरी सोयाबीन बियाण्याची उगवणच झालेली नाही, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. बोगस बियाण्याबाबत अनेक शेतकर्‍यांनी दुकानदाराकडे तक्रारी केलेल्या आहेत.तसेच सदरील सोयाबीन बियाणे खरेदीच्या पावत्याही दाखविलेल्या आहेत. परंतू सदरील दुकानदार हा सर्व प्रकार कंपणीवर ढकलून शेतकर्‍याच्या नुकसानीला बगल देत आहेत.अगोदरच कोरोना संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर हे दुहेरी संकट आल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.त्यामुळे कृषी व महसूल विभागाने लक्ष देवुन या शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावे आणि नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवुन शेतकर्‍यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी या निवेदनात केलेली आहे.
या निवेदनात दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करा, शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज तात्काळ वाटप करा, दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीची त्वरीत अंमलबजावणी करा, बहुतांश ठिकाणी बियाणे महामंडळाचे बियाणे उगवलेले नाही. अशा नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रूपयांचे अनुदान द्यावे, तसेच त्यांच्या नावे जमा झालेले बँकेतील अनुदान त्वरीत वाटप करण्यात यावे.  आदी मागण्याचाही या निवेदनात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देवून नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकाचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या