लातूरच्या उद्योगांनी उभारी घेण्यासाठी शासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न करणार -पालकमंत्री अमित देशमुख






लातूरच्या उद्योगांनी उभारी घेण्यासाठी शासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न करणार*

                                                           -पालकमंत्री अमित देशमुख*

 

*लातूर उस्मानाबाद या भागात कमी पाण्याची गरज असणारे उद्योग येण्यासाठी प्रयत्न करणार*

 

*केंद्राच्या उड्डाण योजनेअंतर्गत लातूरचे विमानतळ लवकरच सुरू होणार*

 

*लातूर येथील विस्तारित एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल हब विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत*

 

*लातूर एमायडिसी मधील बंद उद्योग पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करणार*

 

 

लातूर, दि. 11(जिमाका):-  कोरोना च्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तराबरोबरच संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात टाळे बंदी जाहीर करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने या कालावधीत सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. सध्याच्या काळात लातूर जिल्ह्यातील उद्योगांनी  पुन्हा भरारी घ्यावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.  

          येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात आयोजित लातूर येथील उद्योगांच्या समस्या बाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे, टीना ऑइल चे व्यवस्थापक दिनेश पाटील, उद्योजक श्री कलंत्री, श्यामलाल धुत, श्री पाटील, श्री कोचेटा, श्री मुंदडा आदी सह अन्य उद्योजक उपस्थित होते.

          पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, लॉक डाऊन चा कालावधी संपून अनलॉक 1 सुरू झालेला आहे. त्यामुळे येथून पुढील कालावधीत लातूर शहर व जिल्ह्यातील उद्योगाने उभारी घेण्यासाठी उद्योगांना शासनाकडून जी मदत लागेल त्याची माहिती घेऊन त्यावर सकारात्मक पद्धतीने उपाय योजना राबवल्या जातील असे त्यांनी सांगितले.

      एमआयडीसीकडून बिल्डींग कंपलेशन सर्टिफिकेट सादर करण्यासाठी सवलत मिळणार आहे. तसेच ज्या उद्योजकाच्या प्लॉट पर्यंत एमआयडीसीच्या पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत त्या उद्योजकांना बिल्डींग कंपलेशन सर्टिफिकेट सक्ती करू नये. तसेच उद्योजकांनी प्लॉट घेतल्यानंतर प्लॉटच्या एकूण जागेच्या 40 टक्के बांधकाम करणे उद्योजकाला बंधनकारक आहे त्याबाबत उद्योगाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यात प्रकार करून त्यामध्ये सवलत देण्यासाठी उद्योग विभागाकडे प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री देशमुख सांगितले.

          लातूर विमानतळाची अर्धवट असलेल्या कामांना चालना देण्यात येत असून ती कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच केंद्राच्या उड्डाण योजनेअंतर्गत लातूरचे विमानतळ लवकरच कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती श्री देशमुख यांनी दिली. त्याप्रमाणेच लॉकडाऊन मुळे जागतिक स्तरावरील अनेक उद्योग स्थलांतर करत आहे. त्यात विशेषतः चीनमधील उद्योग स्थलांतर होण्याची शक्यता अधिक असल्याने ते उद्योग महाराष्ट्रात येऊ शकतात. व त्या उद्योगातील कमी पाण्याचा वापर असणारे उद्योग लातूर व उस्मानाबाद या भागात द्यावेत यासाठी उद्योग मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

           लातूर एमआयडीसीतील उद्योगांचा आढावा घेतला असता त्यातील अनेक उद्योग बंद असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच लॉकडाऊन मध्येही अनेक उद्योग बंद झालेले आहेत. तरी हे बंद झालेले सर्व उद्योग पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

           लॉकडाऊन कालावधीत ज्या उद्योगाकडील कुशल- अकुशल कामगार पर जिल्हा व पर राज्यात निघून गेलेले आहेत त्या उद्योजकांनी एमआयडीसीकडे कुशल-अकुशल कामगारांची मागणी नोंदवावी. त्यानंतर एमआयडीसीकडून आपल्या मागणीप्रमाणे स्थानिक स्तरावरून मजूरांच्या पुरवठा करण्यात येईल, असे श्री देशमुख यांनी सूचित केले. तसेच एमआयडीसीच्या नवीन विस्तारित क्षेत्रात ऑटोमोबाईल हब विकसित करण्याबाबत एमआयडीसीने प्रयत्न करावेत असे निर्देश ही त्यांनी दिले.

          यावेळी उद्योजकांनी लातूर एमआयडीसीतील पाणीप्रश्न, कुशल-अकुशल कामगारांचा प्रश्न व वीज बिलात सवलत मिळणे, मार्केट टॅक्स कमी करणे, उद्योजकांना बँकाकडून कमी व्याजदराने कर्जपुरवठा व्हावा, एमआयडीसीतील प्लॉटच्या क्षेत्राच्या 40 टक्के बांधकामाची अट शिथिल करणे, बिल्डींग कंपलेशन सर्टिफिकेट सादर करण्यास सवलत देणे, एमआयडीसीतील उद्योगांना त्यांच्याकडील औद्योगिक कचरा टाकण्यासाठी एमआयडीसीने जागा उपलब्ध करून देणे आदी मागण्या उद्योजकांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे सादर केल्या व त्या मागण्या बाबत शासन स्तरावरून सकारात्मक प्रयत्न केले जातील याची ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली.

          प्रारंभी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. मेघमाळे यांनी बैठकीच्या आयोजनाचा उद्देश प्रस्ताविकात सांगुन शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या