लातूर येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय उपकेंद्र
आरोग्य सेवेतील तांत्रीक मनुष्यबळासाठी नवे अभ्यासक्रम सुरू करणार
नाशिक: (दि. ११) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठचे लातूर येथे विभागीय उपकेंद्र सुरू करण्यात येईल तसेच आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध प्रमाणपत्र अभ्यासक्र सुरू करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या बाविसाव्या वर्धापनदिनानिमित्त येथे केली.
कुलगुरू डॉक्टर म्हैसेकर पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यात असून संलग्नीत महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या कार्यालयीन कामातील अडचणी लवकर सुटाव्यात तसेच कामकाज अधिक सुलभ व्हावे यासाठी विद्यापीठाचे विभागीय उपकेंद्र लातूर येथे सुरु करण्याची कल्पना विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी मांडली होती यानुसार लातूर येथील हे विभागीय उपकेंद्र उभारले जाणार आहे. तसेचआरोग्य क्षेत्रात काम करताना मोठया प्रमाणात कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. याकरीता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. रुग्णालयात सेवा पुरविताना तांत्रिक व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते, या दृष्टीकोनातून विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात सर्टिफिकेट कोर्स इन ऑपरेशन थिएटर टेक्नोलॉजी, सर्टीफिकेट कोर्स इन रेडिओ टेक्नोलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इन इपिडेमिक मॅनेजमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन डायलेसिस, सर्टिफिकेट कोर्स इन ई.सी.जी., सर्टिफिकेट कोर्स इन कॅथलॅब याबरोबरच सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्म, सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद नर्सिंग, सर्टिफिकेट कोर्स इन डेंटल मेकॅनिक आदी एक ते दोन वर्ष कालावधीचे हे अभ्यासक्रम असतील.
या प्रमाणपत्र अभ्याक्रमांमुळे आरोग्य क्षेत्रात तांत्रिक व कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल तसेच तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत असेही कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
--------------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.