सलग अठरा दिवस चालू असलेली इंधन दरवाढ बंद करा.
(मनसेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन)
निलंगा(मोईज़ सितारी)
भारतामध्ये गेली अठरा दिवस रोज इंधन दरवाढ होत असून ती जागतिक बाजारपेठेच्या विपरीत आहेत तरी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करा असे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली निलंगा उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
कोरोना व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिमाण झाला असून, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत नीचांकी स्तरावर पोहोचली आहे . तरीही आपल्याला पेट्रोल आणि डिझेल दररोज वाढीव किमतीला मिळते. जगभरात कच्च्या तेलाच्या किमती एवढ्या खाली आल्या असतानाही पेट्रोल आणि डिझेल इतके महाग का?, असा प्रश्न देशातील नागरिकांना पडला आहे.
भारतात पेट्रोलियम उत्पादनांची मागणी वेगाने वाढली असली तरी उत्पादन पुरेशा प्रमाणात नाही. अशा परिस्थितीत आपल्या जवळपास 85 टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल महागल्यानंतर देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेल महाग होते. मग कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर पेट्रोलियम उत्पादन स्वस्त का होत नाही?
पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्यामध्ये केंद्र व राज्य सरकारचा हात आहे.यात केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क म्हणून 32.98 रुपये, मालवाहतुकीचा खर्च 32 पैसे, डीलर कमिशनचे 3.56 पैसे आणि राज्य सरकारचा व्हॅट 16.44 रुपये असतो. राज्य सरकार व्हॅट डीलर कमिशनकडूनही आकारते. त्यामुळेच एकूणच पेट्रोलची किंमत भयावह(86.66) होते. दिल्ली मध्ये पेट्रोलची बेस प्राईस फक्त 18.96 रुपये आहे.असेच डिझेल बाबतही आहे.केंद्र आणि राज्य सरकार जनतेला लुटत आहेत शेजारील दुष्मणराष्ट्र पाकिस्तान मध्ये तर पेट्रोल 15 रुपयांनी व डिझेल 27 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे कारण जागतिक बाजारात कच्या तेलाच्या किंमतीत कमालीची घट झाली आहे. तरी सरकारने जनतेचे "पाकीट मारणे" बंद करावे व जनतेला कोविड19 सोबत महागाई ने मारू नये असेही निवेदनात सांगितले आहे अन्यथा या जाचक कराविरुद्ध महाराष्ट्र पेटेल असाही इशारा दिला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे, तालुकाध्यक्ष सुरज पटेल,नाजीर मुजावर,जिल्हाप्रसिद्धी प्रमुख यश भिकाणे, शेख शरीफ,नाना माने,मुस्तफा पटेल,विकास सूर्यवंशी आदींच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.