माणुसकी ही कोणत्याही धर्म आणि जातीपेक्षा मोठी.एखादया चित्रपटाला शोभेल अशी घटना. नागपूर-एखादी वयस्कर व्यक्ती




माणुसकी ही कोणत्याही धर्म आणि जातीपेक्षा मोठी.एखादया  चित्रपटाला शोभेल अशी घटना. नागपूर-एखादी वयस्कर व्यक्ती हरवली आणि नंतर काही दिवसांनी ती सापडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र नागपूरमध्ये एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी घटना समोर आली आहे. १९७९ साली जानेवारी महिन्यामध्ये घराबाहेर पडलेल्या पंचफुला शिंगणे अचानक बेपत्ता झाल्या. वयाच्या ५३ व्या वर्षी त्या बेपत्ता झाल्या. मात्र आता वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांची पुन्हा आपल्या कुटुंबाशी भेट झाली आहे. ४१ वर्षांनंतर पंचफुला या आपल्या नागपूरमधील कुटुंबाला पुन्हा भेटल्या आहेत. विशेष म्हणजे ४१ वर्षे पंचफुला यांची काळजी एका मुस्लीम कुटुंबाने घेतली.

२० जानेवारी १९७९ रोजी घराबाहेर पडलेल्या पंचफुला या अचानक गायब झाल्या. त्यानंतर पुढील दोन वर्ष शिंगणे कुटुंब त्यांचा शोध घेत होतं. अखेर त्यांनी दोन वर्षानंतर प्रयत्न सोडून दिले. मात्र अचानक एक दिवस पंचफुला या शिंगणे कुटुंबियांसमोर आल्या आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. पंचफुला या नागपूरपासून ५०० किमी अंतरावर असणाऱ्या मध्य प्रदेशमधील दामोह जिल्ह्यातील कोताताला गावामध्ये राहत होत्या. मानसिक आजार असल्याने पंचफुला यांना अनेक गोष्टी लक्षात राहत नाहीत. यामुळेच त्या स्वत:च्या कुटुंबापासून ४१ वर्षांसाठी दुरावल्या गेल्या.

कुठे आणि कशा सापडल्या?

पंचफुला यांचा संभाळ खान कुटुंबाने केला. याच कुटुंबातील सदस्य असणारे इसरार खान यांनी त्यांचे वडील नूर मोहम्मद यांना पंचफुला या कोताताला गावाजवळच्या रस्त्याच्या कडेला १९७९ साली जानेवारी महिन्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे सांगितले. “माझ्या वडीलांना त्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या सापडल्या तेव्हा त्यांना मधमाश्या चावल्या होत्या. त्यांनी पंचफुला यांनी जवळच्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले. त्या कोण आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना स्वत:बद्दल कोणतीच माहिती सांगत आली नाही. त्या केवळ खमाई नगर, नागपूर, मेडीकल असे शब्द उच्चारत होत्या. माझे वडील नागपूरला जाऊन चौकशी करुन आले मात्र त्यांना पोलिसांकडून काहीच मदत मिळाली नाही,” असं इसरार यांनी सांगितलं.

त्यानंतर पंचकुला या नूर यांच्या कुटुंबासोबतच राहू लागल्या. दोन भाऊ, चार बहिणी अशा मोठ्या कुटुंबामध्ये पंचकुला यांना सर्वजण मावशी या नावानेच हाक मारु लागले. तर पंचकुला या नूर यांना चतुर्भूज भय्या या नावाने हाक मारत. प्रत्येक वेळेस जेवताना पंचकुला या एक पोळी बाजूला काढून ठेवत. ही पोळी भय्यालाल किंवा चतुर्भूजच्या नावाने असल्याचे त्या सांगायच्या. आता खान कुटुंबाला ही दोन्ही नावं पंचकुला यांच्या मुलाची आणि भावाची असल्याचे समजले आहे.

कसा घेतला शोध?

मे महिन्यामध्ये एकदा इसरार यांनी पंचफुला यांच्या तोंडून परसापूर हा नवाच शब्द ऐकला. “याआधी त्यांनी कधी हे नाव उच्चारलं होतं का मला ठाऊक नाही. त्यामुळे मी लगेच हे नाव गुगल केलं. त्यावेळी महाराष्ट्रातील अमरावती तालुक्यात अशी एक जागा असल्याचं मला मॅप्सवर दिसलं. मला गुगल मॅपवर कनिष्का ऑनलाइन नावाचा एक फोन नंबरही सापडला. मी त्या क्रमांकावर फोन केला तेव्हा अभिषेक नावाच्या व्यक्तीने फोन उचलला. त्या व्यक्तीला मी तिथे खामिया नगर अशी जागा आहे का यासंदर्भात विचारलं असता त्या ठिकाणाहून तीन किलोमीटरवर खामिया नगर असल्याचे तायंनी मला सांगितलं. त्यानंतर मी अभिषेकला पंचफुला यांचे काही फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांचे कोणी नातेवाईक तेथे आहेत का यासंदर्भात चौकशी करण्यास सांगितलं,” असं इसरार यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं.
काही दिवसांमध्ये अभिषेकने इसरार यांना फोन करुन पंचफुला या अमरावतीमधील असल्याचं सांगत तेथे आजही पंचफुला यांचे नातेवाई राहत असल्याचे सांगितले. त्या नातेवाईकांनी पंचफुला यांच्या नागपूरमधील कुटुंबाला फोन केला.

नातू आला पण…

१७ जून रोजी भय्यालाल यांचा मुलगा पृथ्वी शिंगणे कोताताला गावात त्याच्या आजीला भेटण्यासाठी आला होता. पंचकुला यांना परत घेऊन जाण्याची इच्छा पृथ्वीने व्यक्त केल्यानंतर संपूर्ण खान कुटुंबाला दु:ख झाल्याचे इसरार यांनी सांगितलं. “तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही त्यांना भेटायला येऊ शकता. पण कृपया त्यांना घेऊन जाऊ नका. मात्र तो आपल्या निर्णयावर अडून राहिला. मात्र त्यावेळी मी त्याला परवानगी दिली. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर आमच्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील असं वचन मी त्यांच्याकडून घेतलं,” असं इसरार म्हणाले.

सारा गाव निरोपाला गोळा झाला

पंचफुला यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव जमा झाले होते. खान कुटुंबाही आपले आश्रू थांबवता येत नव्हते. त्यांनी साश्रू नयनांनी पंचफुला यांना निरोप दिला. पंचफुला यांचा एकुलता एक मुलगा असणाऱ्या भय्यालाल याचे २०१७ साली निधन झाले. पृथ्वीने दिलेल्या माहितीनुसार पंचकुला यांचे पत्नी तेजपाल यांचे १९९५ साली निधन झालं. तर चतुर्भूज या त्यांच्या नातवाचे सहा महिन्यापूर्वी निधन झालं. पंचकुला यांना खान कुटुंबाचा भाग बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नूर यांचेही २००७ साली निधन झालं.

पंचकुला यांची काळजी घेणाऱ्या खान कुटुंबाचे शिंगणे कुटुंबाने आभार मानले आहेत. “मानसिक दृष्ट्या आजारी असणाऱ्या व्यक्तीसाठी एवढं कोण करतं? जवळचे लोकंही अशा लोकांना नीट वागणूक देत नाहीत. या घटनेवरुन माणुसकी ही कोणत्याही धर्म आणि जातीपेक्षा मोठी असल्याचंच दिसून येतं,” असं मत पृथ्वीची आई सुमन यांनी व्यक्त केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या