७३कोरोनाबाधित करणार प्लाझ्मा दान रामचंद्र तिरुके यांच्या पुढाकारातून केला संकल्प मोठ्या संख्येत प्लाझ्मा दान करण्याची देशातील पहिलीच घटना




७३कोरोनाबाधित करणार प्लाझ्मा दान 

रामचंद्र तिरुके यांच्या पुढाकारातून केला संकल्प

मोठ्या संख्येत प्लाझ्मा दान करण्याची देशातील पहिलीच घटना

 लातूर /प्रतिनिधी: अत्यवस्थ असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी उपयोगी ठरणारी प्लाझ्मा थेरपी आता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने लातूर येथील ७३ कोरोनाबाधित रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेऊन तसे संकल्पपत्रही भरून दिले. कोरोनाबाधित झाल्यानंतर कॉरंटाईन सेंटरमध्ये असणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दहा दिवसांच्या कालावधीत बाधित रुग्णांशी संपर्क करून प्लाझ्मा देण्यासाठी तयार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान होण्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना ठरावी.
   जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  तथा विद्यमान सदस्य रामचंद्र तिरुके यांना 12 दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली. तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना १२ नंबर पाटी ( खंडापूर परिसर )येथे असणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात दाखल करण्यात आले. तिरुके यांना कसलीही लक्षणे नव्हती.प्रकृती ठणठणीत होती. या काळात त्यांनी आपल्यासोबत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसोबत चर्चा केली. प्लाझ्मा दानाचे महत्त्व त्यांना पटवून दिले. आपण स्वतः प्लाझ्मा दान करणार असल्याचे सांगितले. तिरुके यांच्या समुपदेशनाने कॉरंटाईन सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या १३५ पैकी ७३ कोरोना बाधितांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.
  शुक्रवारी सकाळी रामचंद्र तिरुके यांच्यासह या ७३ बाधित रुग्णांनी संकल्पपत्र भरून दिले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत सर्वांनी स्वखुशीने प्लाझ्मा दानाचे संकल्पपत्र भरून दिले .
 कोरोना मुक्तीसाठी प्लाझ्मा दान करणे ही काळाची गरज असल्याचे रामचंद्र तिरुके यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोरोनामुळे संपूर्ण जगावर आणि मानवजातीवर संकट ओढवले आहे. या आजारावर विशिष्ट औषध उपलब्ध नाही परंतु कोरोना बाधित रुग्णाने बरे झाल्यानंतर आपला प्लाझ्मा दिला तर शेवटची घटका मोजणारा कोरोना रुग्णही बरा होऊ शकतो. यासाठीच आपण स्वतः प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेऊन इतरांनाही त्यासाठी प्रेरित केल्याचे तिरुके म्हणाले. देशात प्लाझ्मादान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.अनेक शहरात बाधित रुग्ण प्लाझ्मा दानासाठी  पुढे येत आहेत. परंतु ७३ रुग्णांनी एकाच वेळी प्लाझ्मा  दान करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी, असेही तिरुके म्हणाले.
 यावेळी कॉरंटाईन केअर सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ,श्रीधर पाठक ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे. गृहपाल भोजने सर, योग शिक्षिका श्रीमती रामसने, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम प्रमुख एस. एन. कुंभारे ,कॉरंटाईन केअर सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल कांबळे, अनिल वाठोडे, कैलास स्वामी, सुरेंद्र सूर्यवंशी,डॉ. दळवी आदींची उपस्थिती होती.

--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या