प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर आणि गरीब कुटुंबाची सुरु झाली उपासमार. अन्नधान्य संपल्याची लोकांची तक्रार. सरपंच आणि ग्रामसेवकांनी अन्नधान्य पुरवण्यास दिला नकार.




प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर आणि गरीब कुटुंबाची सुरु झाली उपासमार.  

अन्नधान्य संपल्याची लोकांची तक्रार. 
 सरपंच आणि ग्रामसेवकांनी अन्नधान्य पुरवण्यास दिला नकार. 

लातुर : दि. २५ - हरंगुळ बु. येथील मंदार वस्तीवर ज्या घरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आला होता त्या घरासह बाजूचे सात घर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या सर्व घरातील लोक हे गरीब कुटुंबातील असून सर्वांची हलाखीची परिस्थिती आहे. दररोज एमआयडीसीमध्ये किंवा शेतावर मजुरी करून रोजगार आणल्याशिवाय अनेकांची चूल पेटत नाही असे परिवार आहेत. मागील आठ दिवसापासून हे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आल्यापासून या सर्वांचा रोजगार बंद झाला आहे. कालपर्यंत घरात होते ते अन्नधान्य आता संपून गेले आहे. आज सणासुदीच्या नागपंचमीच्या दिवशी सुद्धा सण साजरा करणे तर सोडाच साधी भाजी भाकरी करायलाही आमच्याकडे  अन्नधान्य नाही. आज आमची चूल पेटवली नाही. कालपासून आम्ही आमची अडचण सरपंच आणि ग्रामसेवक यांना फोन करून कळवली आहे. आजही सकाळी फोन करून कळवले तरी तुम्ही तुमच्या पैशाने व्यवस्था करा, आमच्याकडे तुमच्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही. असे स्पष्टपणे सांगितले असल्याचे मंदार वस्तीवरील प्रतिबंधित क्षेत्रातील सुधाकर चामे यांनी हरंगुळ चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांना फोन करून सांगितले आहे.   
कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांची अन्नधान्य संपले असल्यामुळे उपासमार होत असल्याची तक्रार आणि ग्रामपंचायतचे पंच व ग्रामसेवक यांचा नाकर्तेपणा व्यंकटराव पनाळे यांनी ताबडतोब लातूरचे तहसीलदार स्वप्नील पवार यांना कळवून त्या लोकांना अन्नधान्य पुरवठा करण्याबाबत व्यवस्था करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे मोबाईल वर कॉल करून केली आहे. तहसीलदार स्वप्नील पवार यांनी मी ताबडतोब व्यवस्था करतो असे सांगितले. तहसीलदारांचे याबद्दल पनाळे यांनी आभार मानले आहेत. चार दिवसांपूर्वीही पिण्याच्या पाण्यासाठी या लोकांना तहसीलदार व जिल्हाधिकारी  यांच्या कडे तक्रार करावी लागली होती तेव्हा तहसीलदार यांनीच पिण्याच्या पाण्याची सोय लावली होती.
या लॉकडाउनच्या काळात प्रशासना शिवाय कोणीही कसल्याही प्रकारची मदत वाटप करू नये असे बंधन जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांनी जाहीर केले असल्यामुळे गरजू लोकांना वैयक्तिक किंवा सामाजिक काम करणाऱ्या संस्था कोणीही मदत वाटप करू शकत नाहीत.  
प्रतिबंधित क्षेत्रातील लोक  आमच्याकडिल अन्नधान्य संपले आहे. आमच्या अन्नधान्याची सोय करा. असा टाहो फोडत असताना  हरंगुळ बु ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी तुम्ही तुमच्या पैशाने सोय करा आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले असल्यामुळे  प्रतिबंधित क्षेत्रातील  गरीब व मजुरी करणाऱ्या लोकांची उपासमार सुरू झाली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या या ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशीही मागणी तहसीलदार यांच्याकडे हरंगुळ चे माजी सरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.  
प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांनी अन्नधान्य संपल्याची तक्रार केल्याची ऑडिओ क्लिप पनाळे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. तहसीलदार स्वप्निल पवार यांनी योग्य ती कार्यवाही करतो असे सांगितले.

- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार 
   ९४२२०७२९४८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या