दररोज स्वॅब घेणाऱ्या हातांनी बांधली महापौरांना राखी
शहराच्या कोरोनामुक्तीची मागितली ओवाळणी
आरोग्य कर्मचाऱ्यां समवेत महापौरांचे रक्षा बंधन
लातूर /प्रतिनिधी:कोरोनाच्या संकटात दररोज अनेक रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेणाऱ्या व कोरोना लढ्यात सर्वात पुढे राहून कार्य करणाऱ्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना राख्या बांधल्या. हातावर राखी बांधून स्वतःचे रक्षण करण्याची विनंती करण्याऐवजी या भगिनींनी शहराच्या कोरोनामुक्तीची ओवाळणी महापौरांकडे मागितली.या लढाईत आघाडीवर राहून स्वतः पुढाकार घेणाऱ्या महापौरांनी आम्हाला असेच पाठबळ द्यावे,अशी विनंती त्यांनी केली.
मागील दोन-तीन महिन्यांपासून लातूर शहर कोरोना विरोधात लढा देत आहे.शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी झोकून देऊन काम करत आहे.त्यातही आरोग्य विभाग आणि या विभागातील महिला कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे.संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यापासून ते कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची दैनंदिन तपासणी करण्याचे काम या महिला कर्मचारी करत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून, कुटुंबियांपासून दूर राहून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाचा सण साजरा करत असताना या महिला कर्मचाऱ्यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना राखी बांधून लातूरच्या कोरोना मुक्तीसाठी खंबीरपणे नेतृत्व करत असल्याबद्दल आभार मानले.प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रियंका झुंजे यांच्याकडे स्वॅब घेण्याचे काम असते.त्यांनी सर्वात प्रथम महापौरांना राखी बांधली.त्यांच्याशिवाय आरोग्य विभागातील महिला कर्मचारी रक्षाबंधनासाठी उपस्थित होत्या.महापौर विक्रांत गोजमगुंडे हे शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी स्वतः आघाडीवर राहून आम्हाला पाठबळ देत आहेत.राखी बांधल्यानंतर भावाने बहिणीची सुरक्षा करण्याचे वचन द्यायचे असते.महापौरांनी आमच्यासह शहरातील प्रत्येक महिला ही माझी भगिनी असून त्या सर्वांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.कोरोना विरुद्धच्या लढ्यात आजवर भावाप्रमाणे ते पाठीशी उभे आहेत.यापुढेही त्यांनी असेच पाठबळ द्यावे,ही ओवाळणी मागितल्याचेही त्या म्हणाल्या.आरोग्य अधिकारी सुधा राजुरकर,आरोग्य सेविका एस.एन.सुरवसे, यु.जी.सादगिरे,
संजीवनी गायकवाड यांनीही महापौरांना राख्या बांधल्या.
चौकट
महापौरांच्या रूपाने भाऊ भेटला.
आरोग्यसेविका सौ सुरवसे म्हणाल्या की, माझा भाऊ पुण्यात आहे. राखी पौर्णिमेसाठी तो येऊ शकत नाही किंवा मी देखील तिथे जाऊ शकत नाही.महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना राखी बांधण्याची संधी मला मिळाली. मला माझा भाऊ भेटला, असेही त्या म्हणाल्या .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.