लोदगा येथे तयार झालेल्या बांबू फर्निचरची मालदीवला निर्यात
जागतिक दर्जाच्या रिसॉर्टसाठी होणार वापर
लातूर/ प्रतिनिधी: फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने लोदगा येथे बांबू पासून तयार करण्यात आलेल्या फर्निचरची मालदीव येथे निर्यात करण्यात आली. मालदीव येथे उभारण्यात येत असलेल्या जागतिक दर्जाच्या रिसॉर्टसाठी हे फर्निचर वापरण्यात येणार असून मराठवाड्यातून झालेली बांबू फर्निचरची ही पहिलीच निर्यात ठरली.
शेतकऱ्यांनी बांबूची अधिकाधिक लागवड करावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल प्रयत्नशील आहेत. त्यांनी लोदगा येथे ३५ एकरवर बांबू लागवड केली आहे. मांजरा व गोदावरीच्या काठावरील शेतकऱ्यांनी बांबू लावावा यासाठी प्रयत्न करतानाच त्यांना रोपे उपलब्ध करून देण्यासाठी लोदगा येथे टिशू कल्चर लॅब सुरू करण्यात आली आहे.बांबू उत्पादित झाल्यानंतर त्यावरील प्रक्रिया उद्योग उभे रहावेत यासाठीही त्यांनी पावले उचलली आहेत.मागील वीस वर्षात बांबूवर प्रक्रिया करणारी महाराष्ट्रातील एकमेव कॉनबॅक या संस्थेसोबत फिनिक्स फाउंडेशनने यासाठी करार केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बांबूवर प्रक्रिया करून त्याचा अधिकाधिक मोबदला मिळवून देण्यासाठीच हा उपक्रम राबवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून लोदगा येथे तयार झालेल्या बांबूपासून फर्निचर तयार करण्यात आले.
मालदीवमध्ये जागतिक
दर्जाच्या रिसॉर्टची उभारणी सुरू आहे.त्यासाठी हे फर्निचर तयार करून देण्याची ऑर्डर संबंधितांनी दिली होती. त्यानुसार फर्निचर तयार झाल्यानंतर न्हावाशेवा बंदरामार्गे ते मालदीवला पाठवण्यात आले आहे. कोरोनामुळे जागतिक संकट आणि बेरोजगारी ओढवलेली असतानाही संस्थेला परदेशातून काम मिळाले होते.विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय मानांकन असणाऱ्या संस्थेकडून या कामाची मागणी करण्यात आलेली होती. त्यानुसार संस्थेने मागणी पूर्ण केली.
मराठवाडा आणि त्यातही लोदगा येथे जागतिक दर्जाच्या फर्निचरचे काम करण्यात आले.
मराठवाड्यातून झालेली बांबू फर्निचरची ही पहिलीच निर्यात ठरली.या माध्यमातून बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ खुली झाली आहे. उत्पादित बांबूला चांगला दर मिळत असून यातून शेतकऱ्यांचा लाभ होणार असल्याची माहिती पाशा पटेल यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.