सोयाबीन नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी - आ.अभिमन्यू पवार

 सोयाबीन नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी - आ.अभिमन्यू पवार. 








औसा - उडीद व मूग या पिकानंतर आता सोयाबीन सुध्दा शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे.सततधार होत असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन शेंगाला कोंब फुटले असून या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे.आशा परिस्थितीत शासनाने सोयाबीन नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


        


            दि. १८ सप्टेंबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जावून सध्याच्या लातूर जिल्ह्य़ातील सोयाबीन नुकसानी बाबत उपजिल्हाधिकारी लोखंडे यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची पुर्ण माहिती दिली.एकंदरीत लातुर जिल्ह्यातील ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा खरिप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे.हे पीक काढणीसाठी तयार झाले आहे.आशावेळी पिकाला ३५ डिग्री पेक्षा अधिक तापमान व तीव्र सुर्यप्रकाश ४० टक्के पेक्षा कमी आद्रता तसेच कोरडे हवामान अपेक्षित असणे गरजेचे आहे.मात्र या कालावधीत एक आठवड्यापासून संततधार पाऊस पडत आहे.यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेंगाला जागेवरच कोंब फुटत आहेत.यंदाच्या खरीप हंगामात मुग व उडीद शेतकऱ्यांच्या हातातून गेले असून सोयाबीन बियाणे न उगवणे, दुबार पेरणी, सोयाबीनला अपेक्षित प्रमाणात शेंगा न लागणे, अपेक्षित वेळी आॅगस्ट महिन्यात पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे सोयाबीन बियाणे भरण्यावर झालेला परिणाम आदी संकटानंतर आता थोडेफार का होईना हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनला सततच्या पावसामुळे सोयाबीन शेंगाला कोंब फुटले असल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पन्नाची आशाच मावळली आहे.तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन चक्क पाण्यात असल्याने शेतकरी मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडला आहे.






          तरी नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक व मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे सोयाबीन नुकसानीचे तातडीने पंचनामे करून प्रधानमंत्री पिकविमा योजना व केंद्र व राज्य एसडीआरएफ /एनडीआरएफ निकषानुसार नुकसान भरपाई देण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या सोबत भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,संतोषअप्पा मुक्ता, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील,भाजपचे शहराध्यक्ष लहू कांबळे,अॅड. अरविंद कुलकर्णी,सुनीलअप्पा उटगे, प्रा. भिमाशंकर राचट्टे, उमर फारुख, भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, भिमाशंकर मिटकरी संजय कुलकर्णी, श्रीराम माने,आदी उपस्थित होते... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या