अंत्यविधीसाठी जागा मिळेना, तीन मृतदेह २६ तासांपासून पडून
शहरातील नागरिकांचे पालिकेसमोर हलगी आंदोलन
लातूर/प्रतिनिधी:कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने तीन मृतदेह २६ तासांपासून शवागारात पडून राहिल्याने शहरातील नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेसमोर हलगी आंदोलन करून महापौर-उपमहापौर व आयुक्तांना निवेदन देण्यात आले.हा प्रश्न तात्काळ सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील वेगवेगळ्या समाजातील तीन नागरिकांचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली परंतु पाऊस झाल्याने जेसीबी स्मशानभूमीत फसून बसली. त्यामुळे तेथे अंत्यविधी न करता तेथून दुसऱ्या स्मशानभूमीत ते मृतदेह नेण्यात आले.परंतु तेथील नागरिकांनी अंत्यविधी करण्यास विरोध करून पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तेथून पिटाळून लावले.त्यामुळे मंगळवारपासून बुधवारी सायंकाळपर्यंत तीनही मृतदेह शवागारात पडून राहिले. दरम्यानच्या काळात मृतांच्या नातेवाईकांनी अनेकदा प्रयत्न केले परंतु अंत्यविधी होऊ शकला नाही.यामुळे संतप्त झालेल्या शहरातील नागरिकांनी पालिकेसमोर हलगी लावून आंदोलन केले.
कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, मागील सरकारच्या काळात दिलेली कन्हेरी येथील जागा ताब्यात घेऊन सर्व समाजाच्या कोरोनाबाधित मृतदेहावर तेथेच अंत्यसंस्कार करावेत. संबंधित तीन मृतदेहांचे अंत्यसंस्कार लवकरात लवकर करून घेऊन मृतदेहांची विटंबना थांबवावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे यांना निवेदने देण्यात आली. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन महापौर व उपमहापौर यांनी यावेळी दिले.या प्रश्नावर आगामी दोन दिवसात बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल,असे आयुक्तांनी सांगितले. हे आंदोलन प्रा. ओमप्रकाश झुरुळे,बालाजी पिंपळे,शरणाप्पा आंबुलगे, नितीन मोहनाळे,बाळासाहेब महाजन, कमलाकर डोके पाटील,सुनिल ताडमाडगे,विपीन हालिंगे,निलेश कुर्डे,किशोर रोडगे यांनी केले.
*भविष्यात मृतदेहाची अशी अवहेलना होऊ नये*
प्रा.ओमप्रकाश झुरुळे, आंदोलक
कोणत्याही जाती धर्माच्या मृतदेहाची अवहेलना हे अमानवीय आहे, प्रशासनाने भविष्यात मृतदेहाची अशी अवहेलना होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करून द्याव्यात.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.