लातूर जिल्हयात प्रशासकीय यंत्रणा व जनतेच्या मदतीसाठी काँग्रेस पक्ष कोरोना योध्दयांची फळी उभारणार

 

लातूर जिल्हयात प्रशासकीय यंत्रणा व जनतेच्या मदतीसाठी

काँग्रेस पक्ष कोरोना योध्दयांची फळी उभारणार

 

लातूर प्रतिनिधी : २१ सप्टेंबर २० :

    कोवीड१९ बाधित रूग्ण आणि त्यांच्या कुटूंबियांना योग्य पध्दतीची मदत मिळावी तसेच जीवनावश्यक सेवा नियमीत सुरू रहाव्यात यासाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरोना योध्दांची फळी निर्माण करण्यात येणार आहे.

   राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री तथा पालकमंत्री लातूर अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत नुकतीच लातूर शहर जिल्हा काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीची व्यापक बैठक झाली. या बैठकीत बोलतांना कोरोना महामारीच्या काळात काँग्रेस पक्षाकडून होत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करून लातूर शहर व जिल्हयात पक्षाने कोरोना योध्दांची फळी उभा करावी असे आवाहन, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले होते.

   पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी गाव, प्रभाग, कॉलनी पातळीवर सेवाभावीवृत्तीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची नेमणूक करून त्यांच्यावर त्या परिसरातील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी जबाबदारी देण्याचे निश्चीत केले आहे. दिवसेंदिवस कोविड रूग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसेच आरोग्य, पोलीस यंत्रणेवरील ताण वाढतो आहे. सततच्या कामामुळे या यंत्रणेला अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे. या यंत्रणेचा ताण कमी करून त्यांना मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाची कोरोना योध्दांची फळी निर्माण करण्यात येणार आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि जनता यांच्यात दुवा म्हणून हे कोरोना योध्दे काम करतील. कोवीड तपासणी करणे रूग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांची तपासणी करून घेणे, रुग्णांना रूग्णालया पर्यंत पोहचविणे, त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियाच्या अडचणी सोडविणे यासाठी हे योध्दे काम करणार असून त्यांच्या नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस यांच्या संयुक्त विदयमाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

------------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या