लातूर-नांदेड महामार्गाच्या कामास वेळ लागणार असेल
तर तो रस्ता तातडीने दुरुस्त करून घ्यावा
· लातूर-झहीराबाद महामार्गाचे काम मार्चअखेर पूर्ण व्हावे
· राजीव गांधी चौक - गरुड चौक उडडान पुलाचा प्रस्ताव तयार करावा
· लातूर बार्शी रस्त्याचे चौपदरीकरण करावे
· आष्टा मोड उदगीर रस्त्याचे काम जलद गतीने करावे
पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश
लातूर प्रतिनिधी : २१ सप्टेंबर २० :
लातूर नांदेड दरम्यान महामार्गाचे काम सुरू होण्यास वेळ लागणार असेल तर या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री तथा पालकमंत्री लातूर अमित विलासराव देशमुख यांनी दिले असून या प्रकल्पाचे संचालक पाटील यांनी येत्या काही दिवसात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितले आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्ह्यातुन जाणारे महामार्ग व इतर रस्त्याच्या कामाबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीस सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने लातूर - नांदेड रस्त्याच्या दुरावस्थेबाबत चर्चा झाली, रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या बाबतीत लोकप्रतिनिधींची आंदोलनेही झाली आहेत, या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. पालकमंत्री देशमुख यांनी प्रारंभी सर्व प्रमुख रस्त्याच्या कामाची सध्यास्थिती जाणून घेतली, त्यानंतर लातूर-नांदेड रस्त्याच्या कामाबाबत विचारणा केली असता हा रस्ता भारतीय राष्ट्रीय मार्ग प्राधिकरणाकडून बांधण्यात येत असून सदरील कंत्राटदार हे काम करण्यास असमर्थता दर्शवत आहे, त्यामुळे नव्याने निविदा काढावी लागणार असल्याचे प्रकल्प संचालक श्री पाटील यांनी सांगितले. नव्याने निविदा काढण्याच्या प्रक्रियेला वेळ लागणार असेल तर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावेत असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिले. यावर रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले.
राजीव गांधी चौक ते गरुड चौक उड्डाणपुलाचा विचार व्हावा
सदरील महामार्गावर लातूर शहरात राजीव गांधी चौक ते गरुड चौक दरम्यान पूर्वी उड्डाणपूल प्रस्तावित होता, परंतु नंतर तो रदद करण्यात आला आहे. आता पुन्हा या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करावा त्यासाठी त्याचा आम्ही पाठपुरावा करून असे पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. लातूर ते जहीराबाद या महामार्गाचे काम खूपच संथ गतीने सुरू आहे त्या कामाला गती देण्याच्या सूचनाही यावेळी पालक मंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत. या कामाची गती वाढवून हे काम मार्च २०२१ अखेर पूर्ण केले जाईल असे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्र्यांना सांगितले आहे. आष्टामोड ते उदगीर या रस्त्याचे ही काम लवकरच हाती घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगण्यात
लातूर - बार्शी या रस्त्यावर अधिकची वाहतूक आहे या रस्त्याचे चौपदरीकरण तातडीने करण्याचे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी या बैठकीत दिले. लातूर शहरातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम सध्या सुरू असून पाऊस थांबताच हे काम पूर्ण होईल. त्यानंतर विमानतळ ते मुरुड आकोला रामेगाव पर्यंत चौपदरीकरण हाती घेण्यात येईल, त्याचबरोबर मुरुड शहरांतर्गत पाच किलोमीटर रस्त्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल, असे महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री स्वामी यांनी सांगितले. पावसाळा थांबताच जिल्ह्यातील इतर रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावीत, कंत्राटदाराकडून दर्जेदार कामे करून घ्यावीत असेही निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी या बैठकीत दिले. मुख्य अभियंता पी.के सिंह व अभियंता मुरलीदर चित्रीयेर्ला, सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस.जी गंगथडे, प्रोजेक्ट डायरेकटर सुनील पाटील अधिकारी आदीसह इतर अधिकारी उपस्थित होते.
-------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.