बनसोडे गुरुजी यांचे आत्मकथन सामाजिक चळवळीला प्रेरणा देणारे पालकमंत्री अमित देशमुख

 

बनसोडे गुरुजी यांचे आत्मकथन सामाजिक चळवळीला प्रेरणा देणारे

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ‘निवडुंग ते बोधीवृक्ष’ आत्मकथनाचे प्रकाशन

समाजाचे प्रबोधन आणि समाज उद्धार करण्यासाठी

दत्तात्रय बनसोडे गुरुजींनी अविरत कार्य करावे

लातूर प्रतिनिधी : २७ डिंसेबर २०:









    लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी लिखीत ‘निवडुंग ते बोधीवृक्ष’ ही आत्मकथा सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देणारी ठरेल़ उपेक्षित समाजाला न्याय देऊ पाहणाऱ्‍यांना हे आत्मकथन दिशा देणारे ठरणार आहे, असे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले़. 

   येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात रविवारी ‘निवडुंग ते बोधीवृक्ष’ या आत्मकथनाचे प्रकाशन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष उत्तम कांबळे होते़ प्रमुख पाहूणे म्हणून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ लेखक प्रा़ डॉ़ प्रल्हाद लुलेकर, ज्येष्ठ लेखक डॉ़ सूर्यनारायण रणसुभे यांची उपस्थिती होती़ विचारपिठावर दत्तात्रय बनसोडे व विमलताई बनसोडे यांची उपस्थिती होती़.

    बनसोडे गुरुजी यांच्या आत्मकथनाचे शिर्षकच अतिशय कल्पक आणि सुंदर आहे़ या शिर्षकावरुनच गुरुजींचे आयुष्य कळून येते, असे नमुद करुन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागात ज्या तत्वनिष्ठ व्यक्ती पहावयास मिळतात त्यापैकी बनसोडे गुरुजी हे एक आहेत़. राजकारणात पारदर्शक जीवन जगने शक्य नसते परंतु, बनसोडे गुरुजी त्याला अपवाद आहेत़. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी कधीही नियमाला सोडून काही केलेले नाही़ राज्यकर्त्यांना अशी माणसं सापडणं राज्यकर्त्यांचे काम सुलभ करणारे असते़. बनसोडे  गुरुजींकडे सर्व पदे चालून आली़ त्यांनी कधीही त्यासाठी धडपड केलेली नाही़ जिल्हा परिषदेच्या परिसरात विकासरत्न विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा बनसोडे गुरुजी यांच्यामुळे उभा राहिला़ बनसोडे गुरुजींनी आता समाज प्रबोधनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे़ सामाजिक असमतोल कसा दुर करता येईल याकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली़ 

    यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बनसोडे गुरुजी शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचे नमुद केले़. या प्रसंगी बोलताना प्रा़ लुल्लेकर म्हणाले की, फक्त मोठ्या माणसांचाच इतिहास लिहीला जातो असे नव्हे तर सामान्यांचाही इतिहास लिहीला जातो हे ‘निवडुंग ते बोधीवृक्ष’ या आत्मकथेतून पूढे आले आहे़. हे आत्मकथन अस्तित्वाचा शोध घेणारे आहे़  रडकथा नव्हे़ डॉ़ सूर्यनारायण रणसुभे म्हणाले की, ‘निवडुंग ते बोधीवृक्ष’ ही दलित आत्मकथा नाही़ हे एका प्रामाणिक शिक्षकाचे प्रामाणिक लिखान आहे़ 

   अध्यक्षीय समारोप करताना उत्तम कांबळे म्हणाले, बनसोडे गुरुजी यांची आत्मकथा नवीन पिढीसाठी कंदील ठरावा़ गुरुजींनी बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आत्मकथा लिहीली आहे़ काही इतिहास लिहीतात, काही इतिहास वाचतात तर काही इतिहास घडवतात़ विशेष म्हणजे श्रमाच्या निर्मिती मुल्यांवर विश्वास ठेवणारेच इतिहास घडवतात़ त्यापैकीच एक बनसोडे गुरुजी होत़  प्रास्ताविक डॉ़ गौत्तमी कदम यांनी केले़ पाहुण्यांचे स्वागत डॉ़ मिलींद कदम, प्रा़ शिवशरण हावळे, डॉ़ सतीश कानडे, सहदेव मस्के यांनी केले़ बनसोडे गुरुजी यांना आत्मथन प्रकाशन समिती गंगापूर व गंगापूर ग्रामस्थांच्या वतीने मानपत्र देण्यात आले़ या मानपत्राचे वाचन सर्वोत्तम कुलकर्णी यांनी केले़ या कार्यक्रमा साहित्य क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते़

चौकट 

पुस्तक विकत घेऊन इतरांना भेट देणार

     बनसोडे गुरुजी यांचे ‘निवडुंग ते बोधीवृक्ष’ हे आत्मकथन वाचनीय आणि प्रेरणादायी आहे़ त्यामुळे या पुस्तकाच्या प्रति मी स्वत: विकत घेऊन इतरांना भेट स्वरुपात देणार आहे़ शिवाय महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांत हे पुस्तक असावे, असा प्रयत्नही करु, असे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले़ 

----------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या