शासकीय कॉलनीतील कचरा वर्गीकरण केंद्रास पालकमंत्र्यांची भेट शहरातील ५ प्रभागानी गाठले शून्य कचऱ्याचे उद्दिष्ठ


शासकीय कॉलनीतील कचरा वर्गीकरण केंद्रास पालकमंत्र्यांची भेट 

शहरातील ५ प्रभागानी गाठले शून्य कचऱ्याचे उद्दिष्ठ













 लातूर/ प्रतिनिधी: महानगरपालिकेच्या वतीने शासकीय कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या गाडगेबाबा कचरा वर्गीकरण केंद्रास पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी भेट दिली. या केंद्रात सुरू असणाऱ्या कचरा वर्गीकरणाच्या कामाची पाहणी करून आवश्यक असणाऱ्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
 लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ११,१२ व १३ मधील कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आलेले आहे. या केंद्रात कचऱ्याचे १२ प्रकारात वर्गीकरण केले जाते. त्यातील उपयोगात येऊ शकणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर केला जातो. कचरा वेचक समूहाच्या गटामार्फत यामधील बहुतांश वस्तूंची विक्री केली जाते. ओला कचऱ्यावर देखील याच ठिकाणी प्रिक्रिया केली जाते. या तीनही प्रभागातील कचरा वरवंटी येथील डेपोवर जात नाही. त्यामुळे शहरातच कचऱ्यावर पूर्णप्रक्रिया केली जाते. पालकमंत्र्यांनी या संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी शहरातील काही मुख्य चौकात स्टॉल उभारावेत असेही त्यांनी सुचवले.
   महापौर विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसेवक रविशंकर जाधव ,आयुब मणियार, युनूस मोमीन, आसिफ बागवान, शहराध्यक्ष किरण जाधव, उपायुक्त मंजुषा गुरमे, जनाधार संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे, सई गायकवाड पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
   महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ५ मध्ये डालडा फॅक्टरी येथेही कचरा वर्गीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद चौकात प्रभाग क्रमांक ३ व ४ साठी कचरा वर्गीकरण केंद्र चालविले जात आहे. शहरातील कचरा वरवंटी येथील डेपोवर न पाठवता शास्त्रोक्त पद्धतीने त्याची शहरातच विल्हेवाट लावण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. आगामी काही दिवसात ठाकरे चौक व आर्वी बूस्टर येथेही कचरा वर्गीकरण केंद्र सुरू केले जाणार आहेत. महापालिकेच्या प्रयत्नांना यश येत असून शहरातील पाच प्रभागांची वाटचाल शून्य कचऱ्याकडे होत आहे. या प्रभागांनी शुन्य कचऱ्याचे उद्दिष्ट साध्य केले असून तेथून वरवंटी डेपोवर जाणारा कचरा आता बंद झाला आहे.
   जमा झालेल्या कचऱ्यातून कचऱ्यातील टाकाऊ वस्तुपासून घरगुती वापराच्या वस्तू बनवण्याचे काम महिला बचत गटाच्या वतीने केले जात आहे. त्याची लवकरच खुल्या बाजारात विक्री केली जाणार आहे. शहरातील प्रमुख चौकात या वस्तूंची विक्री केंद्र उभारण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी बोलताना केल्या.

 चौकट ....
पालकमंत्र्यांकडून हिरवा झेंडा ..
महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून स्वच्छता जनजागृती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात स्वच्छताताईंचा समावेश आहे. शहरातील विविध ठिकाणी जाऊन कचरा उघड्यावर न टाकण्याबाबत या पथकाच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या पथकाच्या वाहनास हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या