कौशल्य विकास विभाग व उद्योजकांनी परस्परात समन्वय
ठेवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करावा
*-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.*
*जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी GeM नोंदणी करण्याचे आवाहन*
*अतिरिक्त एमआयडीसीमध्ये वीज पुरवठा सुविधा करण्यासाठी नियोजन समितीकडून वीज
वितरण कंपनीला निधी देणार*
लातूर, दि. 11(जिमाका):- जिल्ह्यात कौशल विकास विभागाकडे सुमारे दीड लाख बेरोजगारांची नोंदणी झालेली आहे व लातूर जिल्ह्यातील उद्योजकांना कामगारांची आवश्यकता आहे. त्यामुळे कौशल्य विकास विभाग व लातूर जिल्ह्यातील उद्योजकांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून लातूर जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा उद्योग मित्र समिती चे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीच्या त्रेमासिक बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज मार्गदर्शन करीत होते. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेश कुमार मेगमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हनभर, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कौसटीकर, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री वाकुडे, लघु उद्योग भरती चे अध्यक्ष वामन धुमाळ, दाल मिल असोशियन चे अध्यक्ष रतन बिदादा, लातूर उद्योग समूहाचे अध्यक्ष चंदुलाल बलदवा, सुनील लोहिया, चाकुर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष शेख करीम, सुरेश हाके व लातूर शहरातील औद्योगिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना स्थानिक स्तरावरच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी लातूर जिल्ह्यातील उद्योजकांनी कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswaym.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे व आपल्या उद्योगाला आवश्यक असलेल्या कामगारांची नोंदणी यावर करावी त्यानुसार कौशल्य विकास विभाग त्या पद्धतीचे कामगार आपल्याकडे पाठविल व त्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले.
शासनाने शासकीय कार्यालयाने जेम्स(GeM) द्वारे ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. शासनाच्या या जेम्स प्रणालीवर लातूर जिल्ह्यातील खूपच कमी उद्योजकांनी नोंदणी केलेले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या प्रणालीवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी केले. वीज वितरण कंपनीने एमायडिसी मधील ज्या डीपी नादुरुस्त आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करून उद्योगांना सुरळीतपणे वीज पुरवठा होईल याची खात्री करून घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.
लातूरच्या अतिरिक्त एमआयडीसी मध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. त्याबाबत स्वतंत्र आराखडा सादर करावा यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती मार्फत वीज वितरण कंपनीला उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सुचित केले. एमआयडीसी मध्ये अंतर्गत रस्ते कामे प्रलंबित असलेले दिसून येत आहे त्यामुळे सदरील ठेकेदारांना नोटीस देऊन ते काम त्याच्याकडून काढून घेऊन व त्याला विहित शासकीय पद्धतीने दंड लावून त्याचा करार रद्द करावा व नवीन ठेकेदाराला ते काम देऊन तात्काळ रस्त्याची कामे पुर्ण करून घ्यावीत असेही त्यांनी निर्देशित केले.
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी ला स्थानिक उद्योजकांकडून कोणत्या बाबीची आवश्यकता आहे व फॅक्टरीला आवश्यक असलेल्या बाबी स्थानिक उद्योजक उपलब्ध करून देऊ शकतात का? यासाठी उद्योजक व कोच फॅक्टरी चे अधिकारी यांच्यात लवकरच समन्वय बैठक आयोजित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले.
लातूर मध्ये डाळ मिल उद्योग मोठ्या प्रमाणावर असून लातूरच्या डाळीला जी. आय. मानांकन मिळण्यासाठी दालमिया असोसिएशन नी सहकार्य करावे. येथील डाळीला जी. आय. मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिल्या.
प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री हनभर यांनी मागील बैठकीत उद्योजकांनी उपस्थित केलेल्या बाबीवर चर्चा झाली व त्या अनुषंगाने जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी व वीज वितरण कंपनीने केलेल्या कामाची माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी उद्योजकांनी एमआयडीसीतील जागेबाबत, रस्ते, सुरळीत वीजपुरवठा व शासनाकडून जीएसटी मध्ये सवलत मिळण्याबाबत मागण्या करण्यात आल्या. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीपूर्वी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या तीन उद्योजकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.