तालुक्यात अनेक ठिकाणी वेळ अमावस्या साजरी

 तालुक्यात अनेक ठिकाणी वेळ अमावस्या साजरी 






औ सा प्रतिनिधी


मार्गशीर्ष महिन्यात येणारी दर्श अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या होय.याचे मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील सोलापूर  उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही अमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.

या वेळ अमावस्ये दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, 

भज्जी,अंबिल,भात,खीर यांचा नैवैद्य दाखवला जातो.तसेच दिवसभर शेतामध्ये जेवणाच्या पंगती उडवल्या जातात. शिवार पुजेचा हा सण उत्साहात साजरा केला जातो.

  शेतकरी आपल्या शेतात वेळ अमावस्येनिमीत्त पांडवांची पुजा मांडतात. या पांडवाना कडब्यांच्या पेंड्या लावून कोप केली जाते. त्यावर नवीन. कापड बांधला जातो.पांडवाला चुना लावून पांढरा रंग दिला जातो. त्यानंतर पुढे केळीच्या पानावर उंडे,भज्जी,अंबिल,भात,खीर, याचा नैवद्य दाखवला जातो.अंबील व पाणी हरहर महादेव पाऊस आला ऐक चांग भलं म्हणत शेतामध्ये शिंपडला जातो.नंतर सर्वजण बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.`सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी सोलापूर  उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने फुललेली असतात.

      एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही! याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण ! रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग! अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पुजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.

लातुर उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ अमावस्या उत्साहात साजरी केली जाते. पण या दोन्ही जिल्हयातील साडेसात गावामध्ये मात्र आजही वेळ अमावस्या साजरी होत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या