मनपाच्या दुकान गाळ्यांच्या लिलावास लाखोंची बोली सात दुकानांच्या लिलावातून मिळाले ३६ लक्ष रुपये

 

मनपाच्या दुकान गाळ्यांच्या लिलावास लाखोंची बोली 

सात दुकानांच्या लिलावातून मिळाले ३६ लक्ष रुपये 


लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पालिकेच्या गाळ्यांचा प्रथमच ई- लिलाव करण्यात आला. या लिलावास शहरातील व्यावसायिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सात दुकानांच्या लिलावातून पालिकेला ३६ लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
   शहरात महापालिकेचे विविध ठिकाणी गाळे आहेत. पालिकेने  काही दिवसांपूर्वी रिक्त असलेल्या गाळ्यांचा ई-लिलाव करण्याचे जाहीर करत त्यासाठी ई बोली मागवल्या होत्या. मनपाच्या विविध व्यापारी संकुलातील सात दुकानांसाठी व्यावसायिकांनी अपेक्षेपेक्षा अधिक बोली लावली.
   लिलाव झालेल्या गाळ्यांमध्ये गंजगोलाई मधील ३, गांधी मैदान परिसरातील २, तसेच सारोळा रोड व्यापारी संकुल आणि लोकनेते विलासराव देशमुख पार्क येथील प्रत्येकी एका गाळ्याचा समावेश होता. गंजगोलाईतील तिन्ही गाळ्यांसाठी प्रत्येकी पाच ५ रुपये बोली अपेक्षित होती. तिथे दोन गाळ्यांना प्रत्येकी साडेपाच लाख रुपये व तिसऱ्या गाळ्याला ५ लाख ६० हजार रुपयांची बोली लावण्यात आली. गांधी मैदान साईट क्रमांक १११ येथील जी-१  क्रमांकाच्या गाळ्यासाठी देखील ५ लाख ६० हजार रुपयांची बोली लागली. गाळा क्रमांक १२८ साठी ४ लाख १० हजार रुपये बोली व्यापार्‍यांकडून लावण्यात आली. या दोन्ही गाळ्यांसाठी प्रत्येकी २ लाख रुपये बोली अपेक्षित होती. सारोळा रोड व्यापारी संकुल येथील गाळा क्रमांक २४ साठी ५ लाख ७० हजार रुपये तर लोकनेते विलासराव देशमुख  पार्क मधील एका गाळ्यासाठी ४ लाख ३० हजार रुपयांची बोली व्यावसायिकांनी लावली.
    या ७ दुकानांच्या ई लिलावातून पालिकेला २३ लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात लिलावानंतर पालिकेच्या तिजोरीत ३६ लाख ३० हजार रुपयांची भर पडली.
  पालिकेने पहिल्यांदाच ई- लिलाव केला. यास शहरातील व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक नजिक पालिकेच्या गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. काही दिवसात त्यांचाही ई-लिलाव केला जाणार असल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर यांनी दिली. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या लिलावातून मनपास चांगले उत्पन्न मिळाले असून यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या संधी देखील निर्माण झाल्या असे मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या