लातूर - गुलबर्गा प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी आता कर्नाटक नेतेही सरसावले...
औसा प्रतिनिधी /- लातूर ते गुलबर्गा व्हाया औसा - उमरगा - आळंद प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गासाठी कर्नाटकातील भारतीय जनता पार्टीचे नेतेही आता सरसावले असून त्यांनी सर्वेक्षण विभागाचे उपमुख्य परिचालक महासंचालक सुरेश चंद्र जैन यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याबाबत ची सविस्तर माहिती अशी की, आळंद जि. गुलबर्गा येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते टि टी सूर्यवंशी यांनी लातूर ते गुलबर्गा नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग औसा - उमरगा - आळंद असाच असावा म्हणून आतापर्यंत सर्व रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली आहे. 1992 पासून केंद्रातील रेल्वेमंत्र्यांना तसेच दिवंगत उपसभाअध्यक्ष एस मलिकार्जुनय्या, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण लातूर ते गुलबर्गा नवीन रेल्वे मार्ग औसा - उमरगा - आळंद मार्ग असावा असा आग्रह धरला आहे, अशी माहिती टि टी सुर्यवंशी यांनी दिली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 148 किलोमीटर अंतराच्या याच रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी दिली आहे. गुलबर्गा आणि लातूर शहराचा व्यापार, उद्योग आणि शिक्षणामुळे संपर्क आहे. त्यामुळे अंतिम सर्वेक्षणात लातूर रोड ते गुलबर्गा ऐवजी लातूर ते गुलबर्गा नवीन रेल्वे मार्ग असाच सुनिश्चित करावा, आणि प्रस्तावित लातूर गुलबर्गा रेल्वे मार्गाची निर्मिती करीत असताना आर्थिक बचत होणारा रेल्वे मार्ग मंजूर करावा अशी मागणी आळंद जिल्हा गुलबर्गा येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते टि टी सूर्यवंशी यांनी केली असून आता या रेल्वेमार्गासाठी कर्नाटक राज्याचे नेतेही सरसावले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.