महिला शक्ती ः 21 व्या शतकातील नवा अविष्कार...!
“स्त्री” ही अदिमाता, सृष्टिच्या निर्मितीचे प्रमुख अंग म्हणून गणली जाते. स्त्री शक्तीचा इतिहास प्राचीन काळापासून ते आजतागायत कर्तृत्त्वाचा धगधगता यज्ञकुंड म्हणून ओळखला जातो. माणूस म्हणून स्त्री आणि पुरूष या दोनच घटकांचा विचार व्हावा लागतो. परंतु पुरूष प्रधान संस्कृतीने प्राचीन काळापासून ते आजतागायत स्त्री शक्तीला दुय्यम स्थान दिले, ही खर्या अर्थाने समतेची शोकांतिका होय!
स्त्री च्या स्वतंत्र अविष्काराची जाणीव महिला शक्तीने स्वतःच्या कर्तृत्त्वावर करून दिलेली आहेच. स्त्रीच्या मातृकुशीतून बहरलेल्या अंकूराने पृथ्वीचे मानवी चैतन्य फुलले. मानवी जीवनाच्या वंशवेलीवर महिला शक्तीने कर्तत्त्ववान नेतृत्त्वाची प्रत्येक पिढी घडविण्यात मोलाचे योगदान दिले. याची आठवण महिला दिनाचा गौरव होताना प्रत्येकाला ठेवायलाच हवी.
महाराष्ट्राच्या क्षितिजावर संत साहित्यातील प्रेरणा फुलविणार्या संत जनाबाईपासून ते कवयित्री बहिणाबाई व आजपर्यंतच्या साहित्य क्षेत्रातील महिलांचा विचार शक्तीचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. समतेचा गाभारा विचारांच्या ऊंचीवर उजळणार्या स्त्री लेखीका, कवियित्री याबरोबरच कणखर नेतृत्त्चाची उंचीही महिला शक्तीने गाठली आहे.
“जया अंगी मोठेपण
त्यांचे झाले समर्पन
कर्तृृत्त्वाने स्त्री शक्तीने
उजळले राष्ट्राचे अंगण”
या आशयपुर्ण ओळीप्रमाणे महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासात राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी आपल्या प्रखर बुध्दिमत्ता व दूरदृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजे म्हणून घडविले. जिजाऊ माँ साहेबांची दूरदृष्टी ही समता, न्याय, बंधूता व लोकसेवेतून आदर्श राज्य घडविण्याची होती. अष्ठपैलू व्यक्त्तिमत्त्त्व घडवून छत्रपती शिवाजी महाराजांना नेतृत्त्वकुशल बनवतांनाच माँ साहेबांनी कर्तव्य आणि कर्तृत्त्वाच्या सर्व जबाबदार्या उत्तमपणे पार पडलेल्या आहेत, म्हणूनच त्या आदर्श माता ठरतात.
महिला शक्ती ची रणांगणावरची शौर्यगाथा जेंव्हा आठवायला लागते, तेंव्हा राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श आठवावाच लागतो. “मेरी झाँसी नही दूँगी म्हणतांना ब्रिटीशांना सळो व की पळो करून सोडणारी त्यांची रणनिती लढवय्या बाण्याची स्त्री शक्ती अधोरेखित करते.
इतिहासाच्या टप्प्यावर लोकसेवेचा संकल्प करून तो पुर्णत्त्वास नेण्यासाठी शौर्य गाजवणार्या अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास ही प्ररेणा म्हणून समोर येतोच. प्राचीन काळात नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठातून ज्ञान संपादन व ज्ञान जागृतीच्या क्षेत्रात स्त्री शक्ती सर्वात पुढे होती. व आजही देशातील सर्व परिक्षांमध्ये गुणवत्तेत स्त्रीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रामुख्याने समजून घेतले पाहिजे.
कर्तृृत्त्वाची किनार डोक्यावरील पदरातून तेजस्वाने झळकली असली तरी स्त्री च्या वाट्याला प्राचीन काळापासूनच दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे पुरूषप्रधान संस्कृतीने स्त्री जन्मावर लादलेले वर्चस्व होय. जुन्या परंपरा,चालीरीती, अंधश्रध्दा या सर्वांचा परिणाम म्हणजे स्त्री शक्तीला देण्यात आलेला दुय्यम दर्जा होय! स्त्री चा जन्म म्हणजे कुटूंबाचे ओझे ही संकल्पना प्राचीन काळात होती ती भावनाच स्त्रीयांच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा ठरली.
चुल आणि मुल या म्हणीपुरते स्त्रीला मर्यादित ठेवण्याचे पाप जुन्या काळातील संस्कृतीने केले,त्यामुळे घराची प्रमुख असतानांही महिलेला सर्वच बाबीतून वंचीत ठेवण्यात आले. शिक्षण, मालकी हक्क, आरोग्य, बौध्दिक क्षेत्र अशा विविध जीवन अंगात केवळ दुषित मानसिकतेमुळे स्त्री शक्ती मागे राहिली.
“जीच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगाची उध्दार करी”
असे जरी आपण म्हणत असलो तरी, त्याच पाळण्याच्या दोरीने बांधून स्त्री शक्तीची चोहोबाजुंनी कोंडी करणारा पुरूष प्रधान समाजही याच मातीत होता आणि पुरूष प्रधान व्यवस्थेचा जुुलमी बंधनाची स्त्री ही गुलाम होतीच हे आजही मान्य करावे लागते.
आज 21 वे शतक आहे. सावित्रीबाई फुलेच्या शिक्षणाच्या मुहुर्तमेठीचा वसा होऊन आजची स्त्री ताठ मानेनेे समाजात वावरतेय समाजाचे प्रत्येक क्षेत्र स्त्रीयांच्या कर्तृत्त्वाने व्यापले आहे. ज्ञानाचा दिप सावित्रीबाईंच्या पदरातून फुलला आणि अवघ्या राष्ट्रातील स्त्री शक्तीच्या विचारांचा अंकूर वेगाने फोफावला स्त्री या शिकल्या, विचारांने खुप मोठ्या झाल्या घराचा उंबरठा ओलांडून त्या फक्त बाहेरच पडल्या, असे नव्हे तर स्त्रीयांनी आपल्या कर्तत्त्वाने एकही क्षेत्र मागे सोडले नाही. शिक्षण, समाजसेवा, सैन्यदल खगोलशास्त्र वैद्यकीय शास्त्र, विमान उड्डाण, अंतराळ, संशोधन, राजकारण, अशा असंख्य क्षेत्रात स्त्री शक्ती आज मोठ्या प्रमाणावर सेवाकार्यात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहे.
“तम सो मा ज्योतीर्गमयः”
या संस्कृत सुवचनाच्या अर्थाप्रमाणे जगात जीथे-जीथे अंधार आहे. त्या-त्या ठिकाणी प्रकाश पेरण्याचे काम महिला शक्तीने केलेले आहे. आजच्या काळातील स्त्री ही स्वाभिमानाची व उच्च जीवन मुल्यांची आदर्श स्विकारलेली, परंतु सर्व क्षेत्रात भक्कमपणे उभी राहून तेजस्वीनी आहे.
राजकीय क्षेत्रात तब्बल 16 वर्षे पंतप्रधान राहणार्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, जागतिक पटलावर आपली तेजस्वी प्रतिमा निर्माण करतात. पोलिस दलात सर्वोत्तम सेवा देणार्या किरण बेदी, आकाशात राहून अंतराळाचा अभ्यास व संशोधन करणार्या कल्पना चावला व सुनिता विल्यम्स जगातच्या सर्वात मोठ्या देशाच्या राष्ट्रपती बनलेल्या प्रतिभाताई पाटील, परराष्ट्र मंत्रालयासारखे महत्त्वपुर्ण खाते सांभाळणार्या ना.सुषमा स्वराज स्वतःच्या कुटुंबावरील आघात झेलत एका मोठ्या राजकीय पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणार्या राजकीय क्षेत्रातील सोनिया गांधी, लोकसभा अध्यक्षा सौ.सुमित्रा महाजन, परदेश मंत्री कै.सुषमा स्वराज, चळवळीला स्वतः नेतृत्त्व करून राजकीय क्षेत्रात कार्यरत झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, साहित्य क्षेत्रातील अरूणा ढेरे, जेष्ठ साहित्यीक विजया राजाध्यक्षा माधूरी शानभाग, अशा असंख्य तेजस्वीनींनी महाराष्ट्राचे व भारताचे अंगण उजळले आहे. व मोठे केले आहे.
“रेषा माझी भाग्याची
ज्योत उजळते तेजाची
अंगी वृत्ती त्यागाची
शक्ती माझी वाघाची”
असे वचन हृदयात फुलविणारी महिला आज केवळ दिपातली ज्योती राहिली तर ती तेजाने तळपणार्या सुर्यबिंबाची बरोबरी करू लागलीय, म्हणूनच तर आज तीच्या अस्तित्त्वाचा स्वीकार सर्वत्र केला जातोय. स्त्री च्या विविध रूपाला आज तमाम मान्यता मिळालीय म्हणूनन आज आदर्श माता, विरमाता, आदर्श बेटी, अशा स्वरूपात समाजात तिचा गौरव होतोय. समाजात वावरतांना ती अनेक विविध क्षेत्रात विविध पुरस्काराने सन्मानित होतोय. इवल्याशा मुलीच्या मुठीतून उमलणार्या तीच्या हातावरच्या भाग्यरेषा तीच्या कर्तृत्त्वाची साक्ष देत आहेत. सत्कार्माच्या कोंदणार्या दडलेल्या स्त्री शक्तीचा अविष्कार आज जागतिक पटलावर 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने गौरवदिन म्हणून साजरा होतोय, हा दिन साजरा होणे हाच महिलांचा खरा गौरव आहे.
स्त्री शक्तीचा जागर साजरा करताना अजूनही मानसिकतेच्या काही संवेदना अजुनही जळमटासारख्या समाजाला चिकटलेल्या दिसतात. याचा परिणाम म्हणून आजही स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार, जुलुम होतच आहेत. पुरूषप्रधान समाजाची मानसिकता अजुनही पुर्णपणे बददलेली नाहीच त्यामुळेच तर आज स्त्रीयांना समाजात बाहेर पुर्ण सुरक्षितता मिळालेली नाही. आजही स्त्रीवरती बलात्काराच्या घटणा घडत आहेत. स्त्री जाळली जात आहे. महिलांची अडवणूक केली जातीय.कुंटुबात मानसिक कोंडमारा केला जातोय, आरोग्याकडे कोणीच लक्ष देत नाही. जगण्याचा संघर्षातला सर्वात मोठा बळी आजही महिलाच ठरतेय. कुटुंब, पती, सासू, सासरे, मुले यांच्या पोषणाची व उदरभरणाच्या तयारीसाठी स्वयंपाक, घराशी एकनिष्ठ राहणारी स्त्री पदोपदी समस्यांच सामना करतेय. सामाजिक भावनिक कोंडमारा करून प्रत्येक दिवस काढण्याचे भय तीच्या वाट्याला आहेच. याहूनही भयानक म्हणजे विज्ञान युगातही बुध्दिवादी जगाच्या यशाचा डांगोरा पिटणारेच तथाकथित बुध्दिवादी सुरक्षित स्त्रीला आईच्या गर्भातच मारत आहेत, स्त्री भू्रणहत्या करीत आहेत. यामुळे स्त्रीचे अस्तित्वच संपत आहे. ही बाब खुप वेदनादायक व क्लेशदायक आहे. एकीकडे स्त्री ग्रामपंचायतीची सरपंच झाली, जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली. आदर्श राज्यकारभार केला. समाजसेवेतून कर्तृत्त्व सिध्द करत त्या-त्या क्षेत्राला उत्तम कार्याचे पारितोषिकेही मिळवून दिले तरीही समाजाच्या मानसिकतेत बदल होत नाही, हा स्त्री शक्तीवरील अन्यायच म्हणावा लागेल.
आज समाजाने मानसिकता बदलली पाहिजे, शासनकर्ते कायदा व्यवस्था याने एकत्रित येऊन स्त्रियांचे सरंक्षण केले पाहिजे. स्त्रिभु्रण हत्या 100 टक्के रोखली पाहिजे, बालविवाह रोखले पाहिजे, 100 टक्के स्त्री साक्षरता व नोकरीची समान संधी स्त्रीयांना मिळाली पाहिजे. मुख्य म्हणजे स्त्रीयांचा सन्मान झाला पाहिजे.
कोणत्याही परिस्थितीत जन्मदात्री स्त्री ही वृध्दाश्रमात जाता कामा नये. महिला अंगणातील तुळस आहे. महिलेच्या अस्तित्त्वाने घराला घरपण आहे. म्हणून तिचे अस्तित्त्व जपले पाहिले. स्वतंत्र विचाराने सर्वांगिण विकासात स्त्री शक्तीचा गौरव होणे व समतेच्या समान संधी मिळाल्यावरच 8 मार्च या जागतिक महिला दिनाचा खरा गौरव होईल.
“महिला”
सत्य, शांती समतेची ज्योती
अखंड जाळते परिश्रमाच्या वाती
करीती सदैव मंगलतेची कामना
समाज सौख्याची मनी भावना
अस्तित्त्व जाळून करिजे औक्षण
प्राण त्यागुनी करीते रक्षण
समाजालाही यावे जरासे भान
मिळावा स्त्री शक्तीलाही सन्मान
ज्ञानरथावर होऊन स्वार
कष्ट घेतले अपारंपार......
कर्तत्त्व असे धारधार
स्त्री शक्तीच जगाची शिल्पकार ....!!
- सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर
(माजी जि.प.अध्यक्षा,लातूर)
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.