शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेच्या चित्ररथाचा
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते शुभारंभ
हिंगोली,(शेख इमामोद्दीन )दि.8: शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना व्हावी यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची व समाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर आधारीत माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, भित्तिपत्रिका चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या चित्ररथावर योजना माझ्यासाठी सर्वांसाठी अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, माझी कन्या भाग्यश्री, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, दुधाळ जनावरांचे गट वाटप, शालेय शिक्षण विभाग तर योजना सामाजिक न्यायाच्या अंतर्गत रमाई आवास (घरकुल) योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनासह कोरोना जनजागृतीची माहिती चित्ररथावर देण्यात आली आहे.
सोबतच सर्वसाधारण आणि समाज कल्याणच्या विविध योजनांचे ऑडिओ जिंगल्सद्वारे लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देवून त्यांना संबंधीत योजनेचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. हा चित्ररथ हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरणार असून अनेक लाभार्थ्यांना तसेच नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
*****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.