बोरसुरी साठवण तलावास 57.87 कोटीच्या निधीस मंजूरी
केंद्रीय मंत्री गडकरींचे आ. निलंगेकरांनी मानले आभार
केंद्रीय मंत्री गडकरींचे आ. निलंगेकरांनी मानले आभार
निलंगा प्रतिनिधी ः- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील साठवण तलावाच्या उर्वरीत बांधकाम व भुसंपादनासाठी 57.87 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता बोरसुरी येथील साठवण तलाव पुर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झालेला असून या बद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आभार मानले आहेत.
शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष पुढाकार घेऊन राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी विशेष निधी मंजूर करून दिलेला आहे. या माध्यमातून बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथे उभारण्यात येत असलेल्या साठवण तलावाच्या उर्वरीत बांधकाम व भुसंपादनासाठी 57.87 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. याकरीता आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला होता. हा साठवण तलाव 95.12 हेक्टर जमीनीवर उभारला जात असून याची पाणी साठवण क्षमता 2.347 दलघमी असणार आहे. या माध्यमातून चार गावातील 453 शेतकर्यांचे 352 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर बोरसुरी, टाकळी, चिलवंतवाडी, कलमुगळी, चांदोरी व चांदोरीवाडी या परिसरातील विंधन विहीरी व विहीरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यासह बोरसुरी परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. हा निधी प्राप्त झाल्यामुळे सदर साठवण तलाव जून 2021 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच हा निधी मंजूर झाला असल्याने आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच आ. निलंगेकर यांनी याकरीता पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याने बोरसुरी व परिसरातील शेतकर्यांसह ग्रामस्थांकडून आ. निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.