मनपा कोविड टास्क फोर्सची बैठक
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होतील याची दक्षता घ्या
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह लसीकरणाचा वेग वाढवावा
- महापौर-उपमहापौर यांच्या सूचना
लातूर/ प्रतिनिधी: वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत मनपा कोविड टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली.बाधित रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध व्हावेत याची दक्षता घ्यावी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, लसीकरणाचा वेग वाढवावा अशा सूचना महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या बैठकीत प्रशासनाला केल्या.
आयुक्त अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस उपायुक्त शशीमोहन नंदा,मयुरा शिंदेकर,सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर,वसुधा फड
,मंजुषा गुरमे,शैला डाके, क्षेत्रीय अधिकारी पांडुरंग किसवे,समाधान सूर्यवंशी, संजय कुलकर्णी,मुख्य लेखाधिकारी प्रभाकर डाके, आस्थापना विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी,बाधित रुग्णांवर उपचार तसेच लसीकरण व चाचण्यांवर भर देणे या तीन प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. कोरोनामुळे आजवर मरण पावलेल्या रुग्णांचे डेथ ऑडीट केले जावे.मरण पावलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलेली तारीख,मृत्यूची तारीख,त्याचे वय याची वर्गवारी करण्याच्या सूचना आयुक्त अमन मित्तल यांनी बैठकीत केल्या. रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमेडीसिवर इंजेक्शन तसेच इतर वैद्यकीय साहित्य खरेदीबाबतही चर्चा झाली.रुग्ण व नातेवाईकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यात सर्वाधिक बेड मनपाकडे-महापौर
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक बेड महानगरपालिकेकडे उपलब्ध असून ही अभिमानाची बाब असल्याचे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले. शहरातील नागरिक मोठ्या आशेने आपल्याकडे पाहत आहेत.बाधित रुग्णांना बेड मिळाले पाहिजेत.गृह विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तींची दररोज तपासणी झाली पाहिजे असे सांगून रुग्ण बाहेर पडत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही महापौरांनी केल्या.
लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करताना अनावश्यक दुकाने चालू राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अत्यावश्यक सेवा म्हणून गणल्या गेलेल्या काही आस्थापना बंद कराव्यात. पालिकेच्या वसुली विभागातील कर्मचारी कोरोना कामासाठी घ्यावेत. चाचण्यांची संख्या वाढवावी. पुढील १५ दिवसात अधिकाधिक लसीकरण करून घेतले जावे,अशा सूचनाही महापौरांनी केल्या.
चौकट १ ...
पत्रकारांसाठी लसीकरण मोहीम...
शहरातील पत्रकारांसाठी टाऊन हॉल येथील ग्रंथालयामध्ये विशेष लसीकरणाची सोय करावी असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सूचित केले. शनिवार व रविवार दोन दिवस ही लसीकरण मोहीम राबवली जावी. महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठीही लसीकरणाचा कार्यक्रम निश्चित करावा,असे ते म्हणाले.कोरोनाबाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी आणखी एक शववाहिनी लवकरात लवकर कार्यान्वित करावी.लिंगायत व मुस्लिम स्मशानभूमीत जागेचा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे कन्हेरी येथील लिंगायत स्मशानभूमीचा वाद दोन दिवसात मिटवावा,असेही ते म्हणाले.
चौकट २ ...
कर्मचाऱ्यांसाठी १० बेड आरक्षित ...
महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांसाठी अधिकाधिक बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. शहरातील नागरिकांची सेवा करताना पालिकेचे अनेक कर्मचारीही बाधित होत आहेत.अशा कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यासाठी १० बेड आरक्षित ठेवण्याच्या सूचना महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या बैठकीत बोलताना केल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.