पोटाला चिमटा घेणार्‍यांना जनता माफ करणार नाही-आ. संभाजी पाटील निलंगेकर

 

पोटाला चिमटा घेणार्‍यांना जनता माफ करणार नाही-आ. संभाजी पाटील निलंगेकर




लातूर /प्रतिनिधी ः- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी म्हणून शासनाने विकेंड लॉकडाऊन घोषीत केले आहे. मात्र कडक निर्बधाच्या नावाखाली जणूकांही लॉकडाऊन लावल्यासारखीच परिस्थिती असून यामुळे अनेकांच्या पोटाला चिमटा बसणार आहे. लातूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनला विरोध होत असून कोणत्याही समाज घटकांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा न करता पालकमंत्र्यांनी जिल्ह्याधिकार्‍यांना शासनाच्या आदेशाबाबत लॉकडाऊनचे निर्देश दिले आहेत. जनतेला गृहीत धरून हे निर्देश दिलेले असून सदर निर्देश तात्काळ मागे न घेतल्यास जनतेचा उद्रेक होईल अस इशारा देऊन पोटाला चिमटा घेणार्‍यांना जनता माफ करणार नाही अशी टिका माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात अघोषीत लॉकडाऊन करण्यात आला असून याबाबत अनेकांकडून विरोध होऊ लागलेला आहे. या पार्श्वभूमीवरच आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध आणून विकेंड लॉकडाऊन घोषीत करण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याने विरोधी पक्ष या नात्याने आम्ही या निर्णयाचे समर्थन केले होते असे सांगून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी कडक निर्बधाच्या नावाखाली शासनाने चक्क सर्व व्यापार बंद करून लॉकडाऊनच घोषीत केल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री नसून पक्षप्रमुख या नात्याने हिटलरशाही पद्धतीने निर्णय लादत असल्याचे टिका करून लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना शासनाचे आदेश जशाला तसे राबविण्याचे निर्देश देऊन पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यातील जनतेवर मोठा अन्याय केला असल्याचे आ. निलंगेकरांनी सांगितले. त्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे जनतेला गृहीत धरून घेतला असावा असे स्पष्ट करून आ. निलंगेकरांनी पालकमंत्र्यांनी जनतेला गृहीत धरू नये असा इशाराही यावेळी दिला. वास्तविक हा लॉकडाऊन घोषीत करण्यापुर्वी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, कामगार तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्यासह लोकप्रतिनिधी व समाजातील विविध घटकांसोबत चर्चा करणे आवश्यक होते. मात्र ही चर्चा करण्याची तसदी न घेता जनतेला गृहीत समजूनच हा निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले असावेत असे सांगून आ. निलंगेकरांनी लातूर मध्ये न येता केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  बैठक घेणार्‍या पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थितीत केले.
लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापुर्वी शासनाने व पालकमंत्र्यांनी हातावर पोट असणार्‍यांसह छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगून आ. निलंगेकरांनी अशा प्रकारची हुकूमशाही आम्ही चालून घेणार नाही असा इशारा दिला.  जनतेच्या आरोग्याची जशी तुम्हाला काळजी आहे तशी आम्हाला सुद्धा आहे असे सांगून आ. निलंगेकरांनी या अडचणीच्या काळात आम्हाला राजकारण करायचे नाही असे स्पष्ट केले. मात्र पोटाला चिमटा घेण्याअगोदर त्यांच्या पोटाचा विचार करणेही आवश्यक होते. त्यामुळेच वीजबिलांची वसुली, बँकेची वसुली ही थांबविण्याची मागणी पुन्हा एकदा आ. निलंगेकरांनी यावेळी केली. एकीकडे लॉकडाऊन लावता आणि दुसरीकडे वसुलही करता त्यामुळे या वसुली सरकारच्या कार्यशैलीवर कडक शब्दात टिका करून पोटाला चिमटा घेणार्‍यांना जनता कधीच माफ करणार नाही. लॉकडाऊनबाबत पुर्नविचार न झाल्यास जनतेचा उद्रेक होईल असा इशाराही आ. निलंगेकर यांनी यावेळी दिला. जिल्ह्यात जी परिस्थिती आहे याबाबत भाष्य करताना कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्यांना रेमडिसेव्हर सारख्या  इंजेक्शनच्या टंचाईला सामोरे जावे लागत असून याबाबत पालकमंत्र्यांनी काय भुमिका घेतली हे स्पष्ट करावे, अशी मागणी करून कोरोनाच्या संकटकाळात भाजपाच्या लोकप्रतिनिधीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या मदतीला धाऊन जावे असे आवाहन आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या