*रेमडेसिवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा आणि काळाबाजार थांबवावा.*
*जिल्हाधिकारी बी पी प्रथ्वीराज यांच्याकडे लोकाधिकारप्रमुखांची मागणी.*
लातुर : दि. १२ - रेमडेसिवीर इंजेक्शनचा लातूर शहरात मोठ्या प्रमाणात कृत्रिम तुटवडा आणि होत असलेला काळाबाजार यावर तात्काळ नियंत्रण करून आवश्यक त्यांना हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्याकडे केली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप व्यवस्थेवर सुसूत्रता ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक व जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पदादूने यांची नियुक्ती करून त्यांचे मोबाईल नंबर आपण जाहीर केलात. या निर्णयामुळे कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा वाटला होता. आपण जाहीर केलेल्या त्यांच्या मोबाईल नंबरवर अनेकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनीही आलेले फोन स्वीकारले नाहीत. किंवा आलेल्या फोनला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अथवा एसएमएस करूनही उत्तर दिले नाही. उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर काम करणारे अधिकारी इतके संवेदनशून्य असावेत याचे नवल वाटते. अशा संवेदनाशून्य अधिकाऱ्यांची आपण केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करून कोरोना रुग्णांना न्याय देतील अशा कर्तव्यनिष्ठ तसेच मोबाईल वरून संपर्क करणाऱ्या व्यक्तींना समाधान होईल असे बोलु शकणाऱ्या आणि माणुसकी जपणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. अशीही मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण करून या गंभीर परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करुन काळाबाजार करणाऱ्या लोकावरही कडक कार्यवाही करावी. व कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा अशी मागणी पनाळे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.