जमाअत ए महेदविया ने नगराध्यक्षांचे घोडे मारले आहे काय ? मास्टर साहेब-मुखीदलाला महेदविया कब्रस्तानसाठीही अशीच गळ घाला - एस.एम.युसूफ़

 जमाअत ए महेदविया ने नगराध्यक्षांचे घोडे मारले आहे काय ? 

मास्टर साहेब-मुखीदलाला महेदविया कब्रस्तानसाठीही अशीच गळ घाला - एस.एम.युसूफ़





बीड (प्रतिनिधी) - नुकतेच शहरातील तकिया कब्रस्तान साठी कब्रस्तान लगत असलेली जागा नगराध्यक्षांनी आपल्या अखत्यारीत वाढवून दिली. यासाठी ज्येष्ठ नेते तथा कब्रस्तान चे प्रमुख सय्यद मोईनोद्दीन मास्टर व विद्यमान नगरसेवक मुखीदलाला निंबुवाला यांनी प्रयत्न केल्याचे प्रसिद्धी माध्यमातून कळाल्याने मनाला प्रश्न पडला की, जमाअत ए महेदविया ने नगराध्यक्षांचे घोडे मारले आहे की काय ? म्हणून महेदविया कब्रस्तान ची मोकळी सहन जागा पिटीआर मध्ये जी बीड नगर परिषद च्या नावे लावण्यात आली ती परत द्यायला तयार नाहीत. उलट ती जागा कधी एखाद्या इतर जमाअतीच्या शादी खाण्याला, कधी  तोतया(डमी) व्यावसायिकाला ९९ वर्षाच्या भाडेतत्त्वावर(त्याच्या नसलेल्या उद्योगासाठी), तर कधी इतर जमाअतीच्या  जनाजा नमाज पठण करण्याच्या नावाखाली  राजकीय लागेबांधे असलेल्यांसाठी किंवा आजी-माजी नगरसेवकांच्या  घशात घालण्याचे प्रयत्न  सातत्याने होत आहेत. तेव्हा आता मास्टर साहेब व मुखीदलाला यांनी महेदविया कब्रस्तानच्या जागेसाठीही अशीच गळ घालून जागा कब्रस्तानला परत मिळवून द्यावी. संरक्षक भिंत बांधून द्यावी. तसेच बीड नगरपरिषदेने बुजवलेली कब्रस्तान ची विहीर पुनरुज्जीवित करून द्यावी. अश्या मागण्या मुक्त पत्रकार तथा जमाअत ए महेदविया दायरा कब्रस्तान कमेटी चे कार्याध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केल्या आहेत.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, जमाअत ए महेदविया दायरा कब्रस्तान जवळपास साढे चारशे वर्षांपासून मोमीनपुरा भागात आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेले हे पुरातन कब्रस्तान मुस्लिम समाजामध्ये अत्यंत अल्प असलेल्या महेदविया जमाअतीचे बीड जिल्ह्यातील एकमेव कब्रस्तान आहे. जिल्ह्यात महेदविया बिरादरी संख्येने अत्यल्प आहे. तसेच कब्रस्तान आता जवळपास वाढलेल्या वसाहतीमुळे मध्यभागी आल्याने काही उपटसुंभांनी कब्रस्तान ची समोरील जागा अतिक्रमण करून गिळंकृत केली आहे. तर काहींनी पत्र्याचे शेड मारून कब्जे केले आहेत. एवढेच नव्हे तर ढगे कॉलनी-मोमीनपुरा बायपास रस्ता बनविताना कब्रस्तान च्या संरक्षक भिंती बाहेर असलेली कब्रस्तान ची पुरातन विहीर सुद्धा बीड नगर परिषदने हलगर्जीपणे दगड, गोटे, माती, मुरूम टाकून बंद करून टाकली आहे. या प्रकरणांपैकी काही प्रकरण उच्च न्यायालयात  न्यायप्रविष्ट आहेत. तर कब्रस्तान ची विहीर पुनरुज्जीवित करण्याकरिता नगर परिषदेसह  जिल्हाधिकारी यांच्याकडेही पाठपुरावा सुरू आहे. परंतु महेदविया जमाअतचा एकही सदस्य राजकारणात नसल्याने किंवा राजकीय नेत्यांच्या मागे पुढे फिरत नसल्याने किंवा त्यांचे बाहुले बनत नसल्याने महेदविया दायरा कब्रस्तान साठी महेदविया जमाअत चे मोठ्या प्रमाणात दमन होत आहे. शासकीय-प्रशासकीय स्तरावर महेदविया कब्रस्तान ला न्याय मिळवून देण्यासाठी कोणताही राजकीय नेता किंवा पुढारी पुढे येत नाही. उलट कब्रस्तान च्या जागेवर अतिक्रमण करणारे लोक हे राजकीय लोकांशी जवळीक असणारे असल्याने त्यांना राजकीय लोकांकडून वेळोवेळी वरदहस्त मिळते. या सर्व बाबी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांना माहिती असून सुद्धा शहराचे प्रथम नागरिक म्हणून त्यांनी त्यांच्या गेल्या तीस-पस्तीस वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत महेदविया  जमाअतीला दायरा कब्रस्तान प्रश्नी कधीही न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणुन आजमितीला कब्रस्तान ची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. संरक्षक भिंतीची पडझड होऊन दुरावस्था झालेली आहे. पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेली विहीर जमीनदोस्त होऊन पडली आहे. यामुळे प्रश्न पडतो की, जमाअत ए महेदवियाने नगराध्यक्षांचे घोडे मारले आहे की काय ? म्हणून ते दायरा कब्रस्तान ला गेल्या अनेक वर्षांपासून न्याय द्यायला तयार नाहीत. याकरिता आता ज्येष्ठ नेते मोईन मास्टर व नगरसेवक मुखीदलाला नींबूवाला यांनी तकिया कब्रस्तान सारखेच जमाअत ए महेदविया दायरा कब्रस्तान साठी सुद्धा राजकीय नेत्यांना गळ घालून कब्रस्तान ची झालेली दुरावस्था सुधारावी. जवळपासचे अतिक्रमण हटवून द्यावे. तसेच कब्रस्तान च्या विहिरीचे पुनरुज्जीवन करून द्यावे. अश्या मागण्या मुक्त पत्रकार तथा जमाअत ए महेदविया दायरा कब्रस्तान कमिटीचे कार्याध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केल्या आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या